नागपूर विद्यापीठ दर्जेदार शिक्षणाचे केंद्र व्हावे – राज्यपाल

136

देशाच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूर विद्यापीठाने आपल्या देदिप्यमान इतिहासात अनेक महापुरुषांना, महान व्यक्तिमत्त्वांना घडविले आहे. यापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची ओळख दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून सर्वत्र व्हावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी दिल्या.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाचे गुरुवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला होमी बाबा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे उपस्थित होते. नागपूर विद्यापीठाची स्थापना शंभर वर्षांपूर्वी ४ ऑगस्ट १९२३ मध्ये झाली. या विद्यापीठातून देशाच्या विकासात हातभार लावणारे मान्यवर पुढे आले आहेत. त्या विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्याला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात उपस्थित राहिल्याचे समाधान असल्याचे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

(हेही वाचा – Indian Railways Rule: देशातील अशी पहिली ट्रेन ज्यामध्ये नॉन व्हेज Not Allowed!)

१०० वर्षे एखादी संस्था विद्यादानाचे काम करते हे अतिशय प्रेरणादायी आहे. या भूतकाळातून नव्या भविष्याचा आराखडा आम्हाला तयार करायचा आहे. या विद्यापीठातून देशाचा गौरव वाढवणारे नामवंत तयार झाले आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला घडविणारे हे ज्ञानपीठ आहे. नागपूरचे गडकरी हे रोडकरी आहेत, असे सन्मानाने देशभरात म्हटले जाते. आपल्या शहराची ओळख त्या ठिकाणच्या संस्था, त्या ठिकाणचे व्यक्तिमत्व तयार करीत असते. त्यामुळेच नागपूर विद्यापीठ हे दर्जेदार शिक्षणाचे केंद्र कायम राहील याकडे जागृतपणे लक्ष ठेवा, तसे प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

अमेरिकेला विद्यापीठांनी घडविले 

अमेरिकेसारखा देश आपल्या विद्यापीठांच्या संशोधनाने ओळखला जातो. स्टॅमफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन जगापुढे आणल्यामुळे हजारो स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या आहेत. या ठिकाणच्या संशोधनातून अमेरिका जागतिक महासत्ता झाली आहे. अमेरिकेला विद्यापीठांनी घडविले आहे. त्यामुळे विद्यापीठांमधून मानसिकता बदलाचा संकल्प मांडला गेला पाहिजे, नवीन काही घडविण्याची मानसिकता तयार करावी लागेल. नवनिर्मितीच्या प्रवृत्तीतून देशासाठी संपत्ती निर्माण करणे व त्यातून सामाजिक नीतिमत्ता निर्माण करणे आज आवश्यक आहे, असे मत अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

नागपूरसारख्या मध्यवर्ती शहरात असलेल्या विद्यापीठाने एकीकडे देश आर्थिक सत्ता होत असताना दुसरीकडे देशात वाढलेली आर्थिक विषमता कशी कमी करता येईल, यासाठी ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी संशोधन करावे. विद्यापीठातील संशोधन व त्याचा ग्रामीण भागात केलेला उपयोग यातून ही दरी कमी होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना ही त्यांनी केली. आजचा दिवस केवळ भूतकाळ आठवण्याचा नसून नवे आराखडे बांधण्याचा असल्याचेही आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.