सदा सरवणकर यांनी पक्ष सोडणे वैद्य यांच्या पथ्यावर

163

विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांनी बाळासाहेब शिवसेना गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या नामफलकाला काळे फासणाऱ्या माजी महापौर मिलिंद वैद्य यांना शिवसेना पक्षाने उपनेते बनवले. परंतु उपनेते बनवण्यासाठी सदा सरवणकर यांच्या फुटीचा मुहूर्त शोधावा लागला आहे. यापूर्वी सरवणक यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी वैद्य यांच्यावर विभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर यावेळी त्यांच्या गळ्यात उपनेतेपदाची माळ पक्षाने घातली आहे. त्यामुळे जोशी सरांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या माजी महापौर व माजी आमदार विशाखा राऊत यांच्यानंतर वैद्य यांना उपनेते पद बहाल करत सरांच्या या शिष्याचा गौरव केला असल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : …या दोन कारणांसाठी आरक्षण सोडत कायम ठेवली जावू शकते! )

वैद्य अँक्शन मोडमध्ये

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर, या गटामध्ये दादर-माहिमचे आमदार व विभाग क्रमांक १०चे विभागप्रमुख सदा सरवणकर हे सामील झाले. सदा सरवणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी सरवणकर यांच्या फलकाला काळे फासण्यासाठी पुढाकार घेतला. आजवर अँक्शन मोडमध्ये नसणाऱे वैद्य हे अचानक अँक्शन मोडमध्ये आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले. परंतु वैद्य यांनी दाखवलेल्या या आक्रमतेची दखल घेत त्यांच्या निष्ठेचे गौरव करत पक्षाने वैद्य यांची उपनेते पदी नियुक्ती केली. उपनेते बनल्यानंतर मातोश्रीवर त्यांचा गौरव करण्यात आला. मागील पाच ते सात वर्षे सक्रीय शिवसेनेपासून थोडे अंतर ठेवून राहणाऱ्या वैद्य यांच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांला उपनेते पद बहाल करण्यात आले आहे. मिलिंद वैद्य हे शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे मानस पूत्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोशी यांची त्यांची भेट घेत आशिर्वाद घेतल्यानंतर शिवसेनेने वैद्य यांना उपनेते बनवण्याची वेळ आली,असे बोलले जात आहे.

( हेही वाचा : काँग्रेसमध्ये मुंबईत पडतेय उभी फूट? )

मिलिंद वैद्य यांच्यावर दोन वेळा हल्ले झाले आहे. त्यातूनही मरणाच्या दारातून परत आलेल्या वैद्य यांना माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी महापौर पदाची उमेदवारी देतानाच काँग्रेसचे नगरसेवक फोडून महापौर बनवले. त्यानंतरच्या निवडणुकीत प्रभाग आरक्षण बदलल्याने त्यांनी थेट माटुंगा पश्चिम व दादरमधील प्रभागात त्यांनी निवडणूक लढवली. परंतु मनसेचे मनिष चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्या आधीच्या निवडणुकीत शिवसेनेचे संतोष परब हे निवडणूक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे येथील पोटनिवडणुकीत वैद्य यांना पुन्हा संधी मिळाली आणि ते निवडून आले. परंतु २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते माहिममधून प्रभाग क्रमांक १८२मधून निवडून आले. पण जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपद सोडले तर पाच वर्षांत त्यांना माजी महापौर तसेच निष्ठावान शिवसैनिक असताना पक्षाने कोणत्याही वैधानिक तथा विशेष समितींचे अध्यक्षपद दिले नाही. उलट पाच वर्षांत त्यांना पक्षाने बाजुला केले. पाच वर्षांमध्ये पक्षाने त्यांच्या अनुभवाचा वापरही करून घेतला नाही. परंतु सदा सरवणकर यांनी पक्ष सोडताच आणि त्यांच्या विरोधात त्यांनी आवाज फोडताच पक्षाला त्यांच्या निष्ठेची आठवण झाली,असे दिसून येते.

सन २००५च्या महापुरामध्ये मातोश्रीच्या परिसरामध्ये पाणी तुंबल्याने, सर्वांत प्रथम मिलिंद वैद्य आणि त्यांच्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांना बोटीमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी हलवले होते. त्यामुळे वैद्य हे सरांप्रमाणे मातोश्रीच्या अगदी जवळ पोहोचले होते. परंतु मनोहर जोशी यांनी उध्दव ठाकरे यांच्याबदद्ल वक्तव्य केल्यांनतर दसरा मेळाव्या व्यासपीठावरून त्यांना अपमानित करून खाली उतरवले होते. त्यानंतर जोशी समर्थक असलेल्या राऊत आणि वैद्य यांना पक्षाने बाजुला ठेवले होते. परंतु मागील निवडणुकीत मनसे आणि भाजपचे आव्हान पाहता प्रभाग क्रमांक १९१मधून विशाखा राऊत आणि प्रभाग क्रमांक १८२मधून मिलिंद वैद्य यांना पक्षाने केवळ निवडून येणारे चेहरे म्हणून उमेदवारी दिली होती. सरांचे समर्थक असलेल्या विशाखा राऊत यांना यापूर्वीच उपनेते बनवण्यात आले होते. त्यानंतर सरांचे दुसरे शिष्य असलेले मिलिंद वैद्य यांना पक्षाने उपनेते पद देत सरांसह त्यांच्या समर्थकांना जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वैद्य यांचा पक्षात बहुमान मिळायला एवढी वर्ष का लागली असा प्रश्न शिवसैनिकांकडून विचारला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.