पोरबंदर येथे वसलेल्या इंडियन नेव्हल एअर एन्क्लेव्हच्या पाच महिला अधिकाऱ्यांनी उत्तर अरबी समुद्रात सागरी सीमा सुरक्षा करण्याची मोहीम यशस्वी करून एक नवा इतिहास रचला आहे. सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी खास करून डॉर्नियर – २२८ या जातीचे विमान वापरले जाते. या विमानाच्या मदतीने सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी टेहळणी केली जाते. आतापर्यंत ही जबाबदारी केवळ पुरुष वैमानिकच पार पडत असत, मात्र यंदा पहिल्यांदा महिला वैमानिकांच्या पथकाने स्वतंत्रपणे ही जबाबदारी पार पाडली आहे. या पथकात केवळ ४ वैमानिक होत्या, त्यामध्ये महाराष्ट्राची कन्या लेफ्टनंट अपूर्वा गिते यांचा समावेश आहे. या लेफ्टनंट अपूर्वा या महाराष्ट्रातील पहिल्या नौदलातील वैमानिक आहेत. या पथकात पायलट लेफ्टनंट शिवांगी, लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत या महिला वैमानिकांचाही समावेश होता.
महिला वैमानिकांच्या पथकांची यशस्वी मोहीम
अत्याधुनिक डॉर्नियर -२२८ या सागरी टेहळणी विमानांचा या स्क्वॉड्रनमध्ये समावेश आहे. कमांडर एस.के. गोयल या स्क्वॉड्रनचे नेतृत्व करतात. बुधवारी, ३ ऑगस्ट रोजी या महिला वैमानिकांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. कठोर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांचा या मोहिमेच्या पूर्वतयारीमध्ये समावेश होता. सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या कामी भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून नौदलात महिलांचा समावेश करणे, महिला वैमानिकांची नियुक्ती करणे, महिला हवाई संचालन अधिकारी निवड, तसेच २०१८ मध्ये महिला नौकानयन मोहिमेसारख्या अनेक कार्यक्रमांतून भारतीय नौदलाने हे दाखवून दिले आहे.
(हेही वाचा एटीएसकडे असलेले परवेज जुबेर प्रकरण एनआयए आपल्याकडे घेणार?)
नौदलाचा यशस्वी प्रयत्न
सध्या नेव्हीकडे एकूण ४ महिला वैमानिक आहेत. त्यातील २ वैमानिक २०१४ साली तयार झाल्या, लेफ्टनंट अपूर्वा गिते २०२१ मध्ये सहभागी झाल्या. पोरबंदर बॉर्डर ही पाकिस्तानपर्यंत आहे. आजवर सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी टेहळणी करण्याकरता जे पथक असते त्यात प्रमुख नेतृत्व पुरुष वैमानिक करायचे. त्यात ओब्सर्वर आणि पायलट दोन्ही असतात. मात्र या पथकात महिला वैमानिकच का असू नयेत, असा विचार मांडण्यात आला आणि प्रथमच या पथकात ओब्सर्वर आणि पायलट महिला वैमानिक बनल्या. नेव्हीचा हा पहिला प्रयत्न होता, तो यशस्वी झाला. यामुळे आता सागरी गस्तीमध्ये महिलाही पुरुषांच्या बरोबरीने आल्या आहेत. आता त्या नियमित स्वतंत्रपणे दिवस-रात्र सागरी सीमांचे रक्षण करत आहेत, असे लेफ्टनंट अपूर्वा गिते यांचे वडील नारायण गिते म्हणाले. या पथकामध्ये समावेश होण्यासाठी तब्बल 2 वर्षे अपूर्वा गिते यांना शारिरीक, मानसिक, लेखी, सामान्य ज्ञान, वैमानिक प्रशिक्षण अशा विविध पातळीवर कठोर परीक्षांना सामोरे जावे लागल्यानंतर अपूर्वा लेफ्टनंट बनल्या आणि नौदलातील महाराष्ट्रातील पहिल्या वैमानिक ठरल्या ज्या सध्या स्वत:च्या नियंत्रणाखाली सागरी सीमांचे हवाई मार्गाने संरक्षण करत आहेत. जेव्हा नौदलात महिला वैमानिकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा देशभरातून १०० महिलांनी अर्ज केला होता, त्यातील विविध चाचण्यांमधून गळती होऊन केवळ १० महिला निवडल्या, त्यातील काही जणी ट्रॅफिकमध्ये गेल्या, काही विमान तळ क्षेत्राची जबाबदारी स्वीकारली तर काहींनी प्रत्यक्ष लढाऊ विमान शत्रू राष्ट्र अर्थात पाकिस्तानच्या सीमेपर्यंत नेऊन भारतीय सागरी सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली, त्यामध्ये लेफ्टनंट अपूर्वा गिते आहेत, असे लेफ्टनंट अपूर्वा गिते यांचे वडील नारायण गिते म्हणाले.
Join Our WhatsApp Community