कोविडमुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले. या मुलांचा शोध घेण्यासाठी शासनाच्या सर्व शासकीय विभागांनी एकत्र येऊन राबवलेल्या ‘मिशन झिरो ड्राॅप आऊट’ मोहिमेत मुंबई विभागात 2 हजार 757 मुले शाळाबाह्य झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, तसेच रायगड, पालघर, बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे या जिल्ह्यांतील मिळून 3 ते 18 वयोगटातील आतापर्यंत कधीच शाळेत न गेलेली आणि अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2 हजार 700 हून अधिक असल्याची परिस्थिती मिशन झिरो ड्राॅप आऊट मोहिमेतील समिती सदस्यांनी मांडली आहे.
अनियमित उपस्थितीमुळे मुले शाळाबाह्य
कोविड काळात अनेक पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे स्थलांतर करावे लागले. त्यामुळे या काळात अनेक मुलांची शाळांतील उपस्थिती अनियमित झाली. परिणामी ही मुले शाळाबाह्य ठरली. मुंबई विभागात अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, या विद्यार्थ्यांची संख्या 810 आहे. यामध्ये शाळेत अनियमित असणा-या मुला- मुलींच्या संख्येत फारसा फरक नसून मुलांची संख्या 973, तर मुलींची संख्या 966 आहे.
( हेही वाचा: MSRTC : घरातील सामान शिफ्ट करायचंय? मालवाहतुकीसाठी धावतेय एसटी! )
800 हून अधिक मुले कधीच शाळेत गेली नाहीत
मिशन झीरो ड्राॅप आऊट मोहिमेत 3 ते 18 वयोगटातील 808 मुले ही आतापर्यंत कधीच शाळेत गेली नसल्याची माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. यामध्ये दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबईमधील 20, रायगडमधील 34, पालघरमधील 196 मुलांचा समावेश आहे. मनपातील 117, तर ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे 404 मुलांचा समावेशही यामध्ये आहे. या आकडेवारीनुसार, मुंबई विभागातील कधीही शाळेत न गेलेल्या मुलांमध्ये 425 मुले आणि 383 मुलींचा समावेश आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने, ही शोध मोहिम राज्यातील सर्व भागांत प्रभावीपणे पूर्ण करता आली नसल्याने, यंदाच्या शैक्षणिक वर्षात 5 ते 20 जुलैदरम्यान, राज्यभरात ही मोहिम राबवण्यात आली.
Join Our WhatsApp Community