महापालिका निवडणुकीत उध्दव ठाकरे शिवसेना गटासमोर बाळासाहेब शिवसेना गटाचे आव्हान

129

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार व १४ खासदारांसह स्वतंत्र गट फुटल्यानंतर ठाण्यासह इतर जिल्ह्यांमधून शिवसेनेचे पदाधिकारी फुटून शिंदे यांच्या बाळासाहेब शिवसेना गटात सामील व्हायला लागले आहेत. मुंबईतील खासदार,आमदारांसह माजी नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील व्हायला लागले असून, याचा परिणाम काही प्रमाणात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.

मुंबई हा शिवसेनाचा मजबूत पाया म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुंबईमध्ये शिंदे गटाला जास्त काही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी गळाला लावणे शक्य होत नसले, तरी आगामी निवडणुकीत शिंदे गट निवडणुकीत उतरल्यास उध्दव यांच्या शिवसेनेला आव्हान देऊ शकतो.

(हेही वाचाः प्रभाग रचनेचा निर्णय बदलताच शिवसेना ऍक्शन मोडमध्ये!)

मुंबईत शिंदे गटाचे वर्चस्व वाढणार

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार,आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी फुटून बाळासाहेब शिवसेना गटाची स्थापना केली. परंतु मुंबईच्या बाहेरील शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमधून पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात फुटून जात असले, तरी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांना फोडण्यात त्यांना यश येत नाही. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यासह सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव व दिलीप लांडे आदी आमदार फुटून गेले. परंतु आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेतील अधिक पदाधिकारी फुटून शिंदे गटात सामील होतील, अशाप्रकारची शक्यता वर्तवली जात आहे.

यांचा शिंदे गटात समावेश

पण सद्यस्थितीत शेवाळेंच्या लोकसभा मतदार संघात जे शिवसेना नगरसेवक आहेत त्यातील एकमेव वैशाली शेवाळे या त्यांच्यासोबत जाऊ शकतात. याशिवाय माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, समाधान सरवणकर हे शिंदे गटासोबत गेले आहेत. परंतु पहिला अधिकृत शिंदे गटातील प्रवेश दहिसरमधील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केला असून, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालाड येथील माजी नगरसेविका धनश्री भरडकर आणि त्यांचे पती यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, यातील प्रकाश सुर्वे आणि दिलीप लांडे यांच्या विधानसभा क्षेत्रातील तसेच संपर्कातील काही माजी नगरसेवक लवकरच शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे मुंबईत वजन वाढवणार?

मुंबई ही ठाकरेंची असल्याने आजवर शिंदे यांनी कधीही मुंबईत लक्ष घातले नव्हते आणि ठाकरेंनीही बाहेरच्या कुणा नेत्यावर मुंबईची जबाबदारी सोपवली नव्हती. कोविड काळात नगरविकास खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता होती. परंतु ठाकरे यांनी शिंदे यांच्याकडे महापालिका सोपवली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेकडे लक्ष घालण्याची संधीही हुकली. त्यामुळे शिंदे यांचे वजन मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये असल्याने त्यांना मुंबईतील पदाधिकारी फोडण्यात किंवा पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर ठाण्याप्रमाणे त्यांचे पद कायम ठेवण्याचा प्रयत्न करता आलेला नाही.

ठाकरेंना बसणार फटका?

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचे एकूण ८४ नगरसेवक निवडून आले. परंतु पुढे मनसेचे सहा नगरसेवक पक्षात घेतल्याने ही संख्या ९० वर पोहोचली. याशिवाय अपक्षांनी दिलेला पाठिंबा आणि जात प्रमाणपत्र पडताळणीत नगरसेवक अपात्र ठरल्याने दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना उमेदवार विजयी झाल्याने ही संख्या वाढून एकूण शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ९७ एवढी झाली आहे. परंतु या ९७ नगरसेवकांपैकी भविष्यात शिवसेनेला ४० माजी नगरसेवकांचा फटका बसू शकतो. त्यामुळे आजवर जे शिवसेनेच्या तिकीटावर पण स्वत:च्या नावावर निवडून येतात अशाप्रकारचे संभाव्य उमेदवार पक्ष सोडून गेल्यास याचा फटका ठाकरे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः दादर-माहिम,धारावी आणि वडाळ्याच्या शिवसेना विभागप्रमुखपदी महेश सावंत; पक्षातील निष्ठावान शिवसैनिकांवर मात्र पक्षाचा अविश्वास

सर्वांचे लक्ष

पण शिंदे यांचे मुंबईत वर्चस्व नसले, तरी राज्याचे मुख्यमंत्री पद असल्याने त्यांच्या बाळासाहेब शिवसेना गटाला आगामी निवडणुकीत मनसेपेक्षा जास्त जागा निवडून आणता येऊ शकतात,असे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून पहायला मिळत आहे. तसे झाल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेचा सामना भाजप ऐवजी शिंदे यांच्या गटाच्या उमेदवारांशीच होताना दिसेल. त्यातच पुन्हा एकदा २२७ प्रभाग संख्या केल्याने शिवसेनेच्या सर्व विद्यमान माजी नगरसेवकांचे प्रभाग शिंदे गटाच्या हिटलिस्टवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गट आता कुणाला गळाला लावून ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवारांसमोर आपला उमेदवार देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.