गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे फुल्ल असतात. यादरम्यान, एक्स्प्रेसचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून खासगी वाहनाने जातात. मात्र यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी मोदी एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
(हेही वाचा- Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का…?)
कुठून सुटणार ट्रेन? जाणून घ्या वेळ आणि ठिकाण
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी दिनांक २९ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरून ‘मोदी एक्स्प्रेस’ धावणार आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी ट्वीट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाही गणपतीला गावी जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस आणण्यात येणार आहे. गेल्या १० वर्षापासून बसेस सोडत आहोत, त्यानंतर मागील वर्षापासून मोदी एक्स्प्रेस सगळ्यांसाठी सोडण्यात आली. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन तुमची हक्काची मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे. ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून, वैभववाडीमध्ये थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचं जेवण दिलं जाणार आहे. आरतीचं पुस्तकही देणार आहोत. सगळी तयारी झालेली आहे, अशी माहिती देखील नितेश राणेंनी दिले आहे.
गणेशोत्सवाकरता कोकणात जाण्यासाठी सज्ज व्हा… यंदाही धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’!@NiteshNRane @PMOIndia pic.twitter.com/7Yf2v0kEnt
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 7, 2022
राणेंनी असेही केलं आवाहन
गणेशोत्सवासाठी मोदी एक्स्प्रेसने प्रवास करायचा असल्यास तिकीटासाठी भाजपाच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांना फोन करण्याचे आवाहन नितेश राणेंनी केले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील मंडळ आणि तालुका अध्यक्षांना फोन करा आणि आपली सीट बुक करा असे राणेंनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community