पुन्हा चिपळूण, गुहागर तालुक्यावर महापुराचे सावट! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची घंटा

132

मागच्या वर्षी पावसाळ्याचा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात मोठा फटका बसला होता, त्यातही चिपळूण तालुक्याचे अतोनात हाल झाले होते. आता यंदाच्या पावसातही चिपळूण तालुक्यावर महापुराचे सावट येण्याचे संकेत दिसत आहेत. शनिवार, ६ ऑगस्टपासून चिपळूण तालुक्यासह कोकणाला मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. विशेष म्हणजे चिपळूण आणि खेड तालुक्याला जगबुडी नदीचा जोरदार फटका बसत असतो. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली की, या तालुक्यांना पूर येत असतो, रविवारी जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा चिपळूण तालुक्यावर महापुराचे सावट आले आहे.

राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच मुंबई शहरासह उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने  वर्तवला आहे. चिपळूण तालुक्यात वशिष्ठी नदीही दुथडी  भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमध्ये बाजारपेठेतही पाणी शिरले आहे. त्यामुळे तिथलं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा आमिर खानच्या Lal Singh Chaddha चित्रपटावर बंदीची मागणी! का सुरु आहे #BoycottLaalSinghCaddha ट्विटर ट्रेंड?)

७ ते ११ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

७ ते ११ ऑगस्ट दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ८ ते १० ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे गुहागर तालुक्यामध्ये कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्राबाहेर आली आहे. नदी लगतची भात शेती पाण्याखाली गेली आहे. आरे येथेही पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. गुहागरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे पालशेत बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. तर साखळी त्रिशूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाल्यामुळे गावाचा संपर्क तुटला. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. गटाराचे पाणी थेट दुकानात शिरुन शृंगारतळीत व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुहागरमधील साकरी पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे साकरी गावात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्याचबरोबर लागलेली शेतीही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे.

दहिवली खरवते सीमेवरील 10 गावांचा संपर्क तुटला

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील दहिवली खरवते सीमेवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तेथील दहा गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

गोसीखुर्द धरण पानलोट क्षेत्रात पावसानं पुन्हा हजेरी लावताच धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी १३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. या १३ दरवाज्यातून १ हजार ५७६ क्युमेक्से पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विशेष म्हणजे धरण नियंत्रित असल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी मात्र नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.