ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने कम बॅक केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी आणि काजळी या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहचल्या आहेत. पावसाचा जोर पाहता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रत्नागिरीसह रायगड, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसराला अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट दिला आहे. नदीकाठी राहणाऱ्यांनी सावधानता बाळगावी, असा इशारा भारतीय वेधशाळेच्या पुणे शाखेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिला आहे.
मच्छिमारांना धोक्याचा इशारा
संपूर्ण किनारपट्टीवर जोमाने वारे वाहत असल्याने 11 ऑगस्टपर्यंत राज्याच्या किनारपट्टीवर मासेमारी करायला जाऊ नका, असा इशाराही वेधशाळेने मच्छिमारांना दिला आहे. राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर शनिवारपासून वरुण राजाने पुनरागमन केले. ठाण्यातील अंतर्गत भागासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.
रत्नागिरीतील बहुतांश भागात 100 मिमी पाऊस
रविवारी सकाळी साडेआठच्या नोंदीत रत्नागिरीतील बहुतांश भागात 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. देवरुख, राजापूर मंडळ येथे 104 मिमी, कुंभवडे मंडळात 124 मिमी, फणसवणे येथे 115, माभळे येथे 189 तर लांजामंडळ येथे 135 मिमी पाऊस झाला. राजापूरातील नाटे मंडळात 158 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या थैमानामुळे रत्नागिरीतील नदीलगतच्या भातशेतीवरही परिणाम झाला आहे. आरे आणि आसगोली येथील पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत 270 मिमी पाऊस झाला.
कोल्हापुरातही संततधार
कोल्हापूरातील राधानगरी आणि गडहिंग्लज परिसरात पाऊस धो-धो कोळस असल्याने दोन्ही ठिकाणी अनुक्रमे 90 मिमी आणि गगनबावडा येथे 152 मिमी पाऊस झाला आहे.
Join Our WhatsApp Community