इस्रोने रविवारी अंतराळात पाठवलेल्या दोन उपग्रहांचे प्रक्षेपण यशस्वी झाले. मात्र पुढे ते भरकटले आणि चुकीच्याच कक्षेत शिरले. सेन्सर फेल झाल्यामुळे हे उपग्रह भरकटले आहे. यामागील इतर कारणांचा तपास करण्यासाठी विशेष समिती नेमली असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे. यामुळे प्रचंड मेहनत घेऊन ‘स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल डी-1’ या नव्या रॉकेटचे यशस्वी लाँचिंग करणाऱ्या अंतराळ संशोधकांसह विद्यार्थ्यांची मोठी निराशा झाली आहे.
इस्रोने आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँच पॅड-1 वरून रविवारी सकाळी नवीन रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. या रॉकेटसोबत आझादी सॅट उपग्रह पाठवले गेले होते. याचे ७५ पेलोड देशाच्या ग्रामीण भागातील ७५ सरकारी शाळांच्या ७५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बनवले होते. रॉकेटने दोन्ही उपग्रहांना अंतराळात पोहोचवले. मात्र त्यानंतर उपग्रहांकडून डाटा मिळणे बंद झाले. त्यामुळे शिकाऊ शास्त्रज्ञांचीही निराशा झाली. भरकटलेल्या उपग्रहांपैकी ईओएस-02 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा उपग्रह १० महिने अंतराळात काम करतो. त्याचे वजन १४२ किलो आहे. यात मध्यम आणि लांब तरंगलांबीचा इन्फ्रारेड कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याचे रिझोल्युशन सहा मीटर असून, त्याआधारे रात्रीच्या वेळीही निरीक्षण करता येते.
( हेही वाचा: ISTRO कडून पहिले छोटे उपग्रह SSLV-D1 प्रक्षेपित )
उपग्रहांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू – इस्रो
यावर प्रतिक्रिया देताना, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, दोन्ही उपग्रह सेन्सरमधील बिघाडामुळे वर्तुळाकारऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत सेट झाले. या दोन्ही उपग्रहांचा आता काहीही उपयोग नाही. चुकीच्या कक्षेत गेल्यामुळे डाटाचे नुकसान झाले आहे. आम्ही अजूनही या उपग्रहांशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न करत आहोत.
Join Our WhatsApp Community