एका खुनातील साक्षीदाराला न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून दोन गुंडांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मुंबईतील भांडुप पश्चिम येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
साक्षीदार हा भांडुप पश्चिम टेंभीपाडा रोड येथे राहतो. साक्षीदार हे ज्या दुकानात मॅनेजर म्हणून नोकरी करीत होते, त्या दुकानाच्या मालकाची आठ महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. ज्यावेळी ही हत्या झाली त्यावेळी साक्षीदार हे दुकानात हजर होते. ते या गुन्ह्यातील महत्वाचे साक्षीदार आहेत. भांडुप पोलिसांनी या प्रकरणी सचिन कुलकर्णी उर्फ चिंग्या आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. चिंग्या आणि त्याचे साथीदार तुरुंगात असून, त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरून आरोपींना जामीन मिळत नाही म्हणून चिंग्याचे गुंड सहकारी रोहन उर्फ बाबा खेगडे आणि सोहेल जैस्वाल आणि इतर दोन सहकारी असे चौघे शनिवारी साक्षीदार काम करत असलेल्या दुकानात आले आणि त्यांनी साक्षीदाराच्या पोटाला शस्त्र लावून “तू न्यायालयात त साक्ष देऊ नको, त्यामुळे चिंग्या आणि इतरांना जामीन मिळत नाही, तू न्यायालयात दिलेली साक्ष मागे घेतली नाही तर तुझ्या मालकाला जिकडे पाठवले तिकडे तुला देखील पाठवेन, तुझी बॉडी सुद्धा मिळणार नाही, अशी धमकी देऊन मारहाण करण्यास सुरुवात केली.
( हेही वाचा: राजकीय पदार्पणापूर्वीच शिवसेनेवर चढले ‘तेजस’ तेज )
साक्षीदाराने मदतीसाठी इतर दुकानदारांना आवाज दिला असता, या गुंडांनी मदतीसाठी आलेल्यांना शस्त्राचा धाक दाखवला. काही वेळाने हे गुंड निघून गेले. झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या साक्षीदाराने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community