आमदारांना फोन गेले, पण मंत्रिमंडळ समावेशाबाबत निरोप नाहीच!

151
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगाने हालचाली सुरू असताना, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना फोन गेल्याच्या चर्चा कानावर पडू लागल्या आहेत. मात्र, शिंदे गटाकडून एकाही आमदाराला मंत्रिमंडळ समावेशासंदर्भात कळविण्यात आलेले नाही. केवळ ‘मंगळवारी सकाळपर्यंत मुंबईत पोहोचा’, असाच निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शिंदे गटाने आपल्या समर्थक आमदारांना सकाळपर्यंत मुंबईत पोहोचण्याची सूचना केली आहे. लवकरच अधिवेशन होणार असल्याने त्यादृष्टीने रणनीती आखण्यासाठी आपल्याला एकत्रित जमायचे आहे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. या आमदारांकडून मंत्रिमंडळ समावेशाबाबत विचारणा झाली असता, स्वतः एकनाथ शिंदे उद्या सकाळपर्यंत निर्णय कळवतील, माध्यमातील बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे उत्तर त्यांना देण्यात आल्याचे समजते.

गुप्तता का?

युतीच्या समीकरणानुसार शिंदे गटाच्या वाट्याला जास्तीत जास्त १६ जागा येणार आहेत. त्यात ७ किंवा ८ कॅबिनेट आणि उर्वरित राज्य मंत्रीपदे असतील. त्यामुळे इच्छुक अधिक आणि जागा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी उर्वरित आमदारांचे समाधान कसे करावे, असा पेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील समावेशाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. आयत्या वेळी नावे जाहीर करून, उर्वरित आमदारांना पुढच्या टप्प्यात समावेश करू, असे आश्वासन दिले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

पाच नावे पक्की

दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, संदिपान भुमरे आणि शंभूराजे देसाई अशी पाच नावे पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात पक्की झाली असून, स्वतः शिंदे मध्यरात्री किंवा मंगळवारी सकाळी त्यांना फोन करून कळवतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.