शिवसेनेच्या सत्ताकाळात अनेक जुन्या-जाणत्या नेत्यांना बाजूला सारत, उद्धव ठाकरेंची मर्जी राखणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले. पण, पडत्या काळात मर्जीबहाद्दरांचे नेतृत्व कुचकामी ठरू लागल्याने पक्षाची पडझड रोखण्यासाठी आता जुन्या आणि दुर्लक्षित नेत्यांना पुन्हा जवळ करण्याची नामुष्की ‘मातोश्री’वर ओढवली आहे.
( हेही वाचा : CWG 2022 : बॅडमिंटनमध्ये दुसरे सुवर्ण, लक्ष्य सेनची ऐतिहासिक कामगिरी)
उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका करताना त्यांचा ‘पालापाचोळा’ असा उल्लेख केला होता. झाडावरील पालापाचोळा उडून गेला, आता नवी पालवी फुटेल, असे ते म्हणाले होते. पण सत्तेच्या धुंदीत असताना ठाकरेंनी अनेक निष्ठावंतांना ‘पालापाचोळ्या’सारखेच बाजूला केले होते, हेही ध्यानात घेणे गरजेचे आहे. आता संकटकाळात सगळे पर्याय फिके ठरल्यामुळे हाच ‘पालापाचोळा’ खतासारखा कामी येऊ लागला आहे.
मराठवाड्यामध्ये शिवसेना वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दिवाकर रावते यांचे नाव त्यात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बाळासाहेब निवर्तल्यानंतर रावते यांचे मातोश्रीवरील महत्त्व कमी झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असले, तरी त्यांच्याकडील परिवहन खात्याचा अप्रत्यक्ष कारभार ‘बडव्यां’च्याच हाती होता. रावते फक्त नावापुरते होते. त्यांनी याबाबत पक्ष नेतृत्त्वाकडे अनेकदा तक्रार केली, मात्र तिची दखल घेण्याऐवजी त्यांनाच दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. २०१९च्या निवडणुकीत कोणतीही मोठी जबाबदारी नाही, पक्षाच्या बैठकांना बोलावणे नाही, मविआ सरकारमध्ये समावेश नाही, मातोश्रीवर भेट नाही, अशा अनेक प्रकारे अपमानित व्हावे लागल्यानंतर रावते स्वतःहून दूर झाले.
केदार दिघे, अनिता बिर्जे, मिलिंद वैद्य यांची स्थितीही त्याहून निराळी नव्हती. केदार दिघे गेली कित्येक वर्षे शिवसेनेत सक्रिय आहेत. मात्र, त्यांना ना कोणते पद, ना निवडणुकीचे तिकीट मिळाले. त्यामुळे ते नाराज असले, तरी दुसऱ्या पक्षात जाऊनही फारसे काही हाती लागणार नाही, याची जाणीव असल्याने त्यांनी शिवसेनेत राहणे पसंत केले. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केवळ दिघे आडनावामुळे केदार यांना ठाण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे प्रत्येक शिवसैनिकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. अनिता बिर्जे या तर आनंद दिघे यांच्या कार्यकर्त्या. पण त्यांनाही मुख्य प्रवाहात येण्यासाठी २५ वर्षांहून अधिक काळ वाट पहावी लागली.
मिलिंद वैद्य यांचीही तीच गत. सदा सरवणकर शिंदे गटात गेले नसते, तर आपल्याला विभागप्रमुख व्हायची संधी मिळाली नसती, ही बाब ते स्वतःही जाणतात. अलीकडे मातोश्रीवर तळागाळातील कार्यकर्त्यालाही प्रवेश मिळू लागला आहे. उद्धव ठाकरे स्वतः त्यांना भेटतात. त्याचे फोटो समाजमाध्यमातून प्रसारित केले जातात. पण बाळासाहेबांच्या पश्चात सर्वसामान्यांसाठी बंद झालेले मातोश्रीचे द्वार असे अचानक खुले का झाले, यामागची गोम जाणत्या शिवसैनिकांना कळत नसेल का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
जनाधार नसलेल्या सुभेदारांचे प्रयत्न ठरले निष्फळ
धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले ४० आणि अपक्षांसह मित्रपक्षातील मिळून एकूण ५२ आमदार फोडण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी नगरसेवक, जिल्हा परिषद/ पंचायत समितीतील सदस्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली. त्याही पुढे जात शिवसेनेतील नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांना जवळ करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या मर्जीतील अनेक सुभेदार मैदानात उतरवले, पण जनाधार नसलेल्या या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे सावध झालेल्या ठाकरे यांनी जुन्या आणि निष्ठावान शिवसैनिकांना हाक देण्यास सुरुवात केली आहे.
Join Our WhatsApp Community