भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे घाटकोपर परिसरातील ‘पंतनगर मनपा शाळा संकुल’ येथील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह साकारले. सह आयुक्त अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात सोमवारी सकाळी ११.३० वाजता घाटकोपर पूर्व परिसरातील ‘आचार्य अत्रे मैदान येथे आयोजित या कार्यक्रमात तब्बल १२०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
( हेही वाचा : स्मृतीस्थळावरील बाळासाहेबांनी रोपण केले गुलमोहराचे झाड पडले उन्मळून, पण महापालिकेने केले त्यांचे पुनर्रोपण)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह साकारण्यात आले
पंतनगर शालेय संकुलातील शारीरिक शिक्षण व चित्रकला या विभागांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी साखळीच्या सहाय्याने आपल्या देशाचा नकाशा व त्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह साकारण्यात आले होते, अशी माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे देण्यात आली आहे.
“भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा – हर दिल में तिरंगा, जय जवान जय किसान” अशा देश प्रेमाने भरलेल्या घोषणांनी जणू सोमवारी सकाळी आसमंत दुमदुमला होता. विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या तीन रंगी टोप्यांनी देशाचा नकाशा शोभून दिसत होता. शारीरिक शिक्षण शिक्षक बँड पथकाद्वारे राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, एन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community