शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्यानंतर, आता लवकरात लवकर पावसाळी अधिवेशन बोलावण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. प्राप्त परिस्थितीत १७ ते १९ ऑगस्ट असे तीन दिवसांचे अधिवेशन घ्यावे, याकडे सत्ताधाऱ्यांचा कल असून, मंगळवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
( हेही वाचा : ठाकरेंना संकटकाळात आठवले दुर्लक्षित शिवसैनिक)
कर्मचाऱ्यांची शासकीय सुट्टी रद्द
नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर दुपारी ३ वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळातील कर्मचाऱ्यांची शासकीय सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. सर्वपक्षीय गटनेते या बैठकीला उपस्थित राहणार असून, त्यात पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित केली जाणार आहे.
दरम्यान, विधिमंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त परिस्थितीत १७ ते १९ ऑगस्ट, अशा तीन दिवसांत अधिवेशन आटोपून घ्यावे, याकडे सत्ताधारी पक्षाचा कल असून, उद्याच्या बैठकीत त्याबाबत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आधी ११ तारखेला अधिवेशन बोलवण्यासंदर्भात नियोजन सुरू होते; मात्र नवोदित मुख्यमंत्र्यांना त्यांच्याकडील खात्यांचा अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी तारीख पुढे ढकलण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली.
Join Our WhatsApp Community