गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील केबल्स तातडीने हटवा; आयुक्तांनी दिले आदेश

115

महानगरपालिका क्षेत्राची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव हा गेली २ वर्षे ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन साजरा केला. या दरम्यान मुंबईमहानगरपालिकेने वेळोवेळी केलेल्या सुचनांना मुंबईकर नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. परंतु यंदा हा उत्सव निर्बंध मुक्त असल्याने अधिक उत्साहाने साजरा केला जाणार आहे. तरीही यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी पार पडलेल्या श्री गणेशोत्सव समन्वय बैठकीदरम्यान केले. दरम्यान, रस्त्यांवर केबल लटकत असल्यास त्यामुळे श्रीगणेश आगमन व विसर्जन मिरवणुकांना बाधा येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत केबल असल्यास त्या तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

( हेही वाचा : अमर महल ते परळ जलबोगदा प्रकल्प एप्रिल २०२६पर्यंत होणार पूर्ण, पण अमर महल ते वडाळा बोगद्याच्या खोदकामाचे काम ४ महिने आधीच पूर्ण)

या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार उपस्थित होते. तसेच मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती तथा मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर, परिमंडळ दोनचे उप आयुक्त तथा श्री गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या विविध परिमंडळांचे व खात्यांचे उप आयुक्त, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय नौदल, मुंबई पोलीस दल, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेश उत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तीकार संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांचे मार्ग हे प्राधान्याने सन – २०१९ नुसार ठेवण्याचे निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये श्री गणेशोत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश आहे. महत्त्वाच्या सर्व विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वैद्यकीय चाचणी व प्रथमोपचार कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. श्रीगणेश मूर्ती विसर्जन मार्गांची रस्ते खात्याने काळजीपूर्वक पाहणी करावी व त्यामार्गांवर खड्डे असल्यास ते योग्यप्रकारे भरुन घ्यावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) यांना दिले. मुंबईतील ज्या पुलांवरुन विसर्जन मिरवणुका जातात, त्या पुलांची पाहणी करण्याचे प्रमुख अभियंता (पूल) यांना निर्देश आहेत.

विसर्जन स्थळी असणा-या फिरत्या शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांकडून कामगार उपलब्ध करुन घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहे. रस्त्यांवर केबल लटकत असल्यास त्यामुळे श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांना बाधा येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत केबल असल्यास त्या तातडीने हटविण्याचे निर्देशआयुक्तांनी दिले. भरती – ओहोटीचे वेळापत्रक हे संबंधित विसर्जन स्थळी ठळकपणे लावण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय

श्रीगणेश मूर्ती विसर्जनानंतर विसर्जित मूर्तींची छायाचित्रे किंवा व्हिडिओचित्रण कोणीही करु नये, अशा सूचना प्रदर्शित करण्याची विनंती समन्वय समितीतर्फे करण्यात आली. त्यानुसार या प्रकारच्या सूचना प्रदर्शित करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले. बैठकीच्या अखेरीस यंदाचा श्री गणेशोत्सव हा अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.