सत्तास्थापनेनंतर तब्बल ३८ दिवसांनी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रतिबिंब दिसून येत असून, प्रादेशिक समतोल आणि जातीय समीकरणांची जुळवणी करीत शिंदे-फडणवीसांनी भविष्यातील पक्ष विस्ताराची दिशा आखून दिली आहे.
( हेही वाचा : रिझर्व्ह बॅंकेने ‘या’ बॅंकांना ठोठावला दंड; ‘हे’ आहे कारण)
येत्या काळात ९ महानगरपालिका, ९२ नगरपरिषदा, चार नगपंचायती, २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. त्यात औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन शिंदे-फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची आखणी केल्याचे दिसून येत आहे.
मराठवाड्याला मंत्रिमंडळात प्राधान्य देण्यात आले आहे. संभाजीनगरसह आसपासच्या परिसरात प्रभाव पाडू शकणाऱ्या संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे अशा नेत्यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला संजय शिरसाट यांना पुढील विस्तारत संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, खान्देशात एकनाथ खडसे यांना आव्हान देण्यासह राष्ट्रवादीच्या पक्ष विस्ताराला लगाम लावण्याची जबाबदारी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
संजय राठोडांना संधी का?
गेल्या सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांना भाजपच्या दबावामुळे मंत्रीपद गमवावे लागले. त्यांना पुन्हा संधी दिल्यास टीका सहन करावी लागण्याची शक्यता असतानाही केवळ बंजारा समाजाचा मान राखण्यासाठी त्यांचे नाव पुढे केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, ‘एससी’ समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेश खाडे यांना मंत्रीपद देऊन जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. तसेच विजयकुमार गावित यांच्या रूपाने आदिवासी चेहरा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष?
अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळात मराठा नेत्यांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहिले जात असले, तरी पश्चिम महाराष्ट्राला म्हणावी तितकी मोठी संधी मिळाल्याचे दिसून येत नाही. दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्या रूपाने तळकोकणातील गड राखण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला आहे.
मुंबईच्या पदरी उपेक्षा
मुंबईला मात्र केवळ एका मंत्र्यांवर समाधान मानावे लागले आहे. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी यांची नावे चर्चेत होती. परंतु, ऐनवेळी मंगलप्रभात लोढा यांचे नाव पुढे करीत भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मंत्रिमंडळाची यादी
शिवसेना
१) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण
२) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक)
३) संजय राठोड – यवतमाळ दिग्रस
४) संदिपान भुमरे – पैठण (संभाजीनगर)
५) उदय सामंत – रत्नागिरी
६) तानाजी सावंत – पलांडा (उस्मानाबाद)
७) अब्दुल सत्तार – सिल्लोड (संभाजीनगर)
८) दीपक केसरकर – सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
९) शंभूराजे देसाई – पाटण (सातारा)
भाजप
१) राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी (अहमदनगर)
२) सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर (चंद्रपूर)
३) चंद्रकांत पाटील – कोथरूड (पुणे)
४) डॉ. विजयकुमार गवित – नंदुरबार
५) गिरीश महाजन – जामनेर (जळगाव)
६) सुरेश खाडे – मिरज (सांगली)
७) रवींद्र चव्हाण – डोंबिवली
८) अतुल सावे – संभाजीनगर पूर्व
९) मंगलप्रभात लोढा – मलबार हिल