मुंबई महापालिकेची हद्द ही दहिसरपर्यंत असली तरी महापालिका आता मिरारोड-भाईंदर पर्यंत उड्डाणझेप घेणार आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने दहिसर कांदरपाडा ते मिरारोड सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत हे उड्डाणपूल बांधले जाणार आहे. ज्यामुळे मिरा रोड ते दहिसरपर्यंतच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत प्रवाशांना अडकून पडावे लागते, तो प्रवास हे पूल बांधून झाल्यास केवळ पाच ते सात मिनिटांमध्ये करणे शक्य होणार आहे. यामुळे विरार वसईपासून मुंबईत येणाऱ्या तथा मिरा रोडमधील नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे.
भाईंदर ते दहिसर दरम्यान वाहतूक कोंडीचा फटका
मुंबईत प्रवेश करताना बाहेर येणाऱ्या वाहनांना भाईंदर ते दहिसर दरम्यान वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. त्यामुळे अगदी दहा ते बारा मिनिटांच्या प्रवासाला नागरीकांना अर्धा ते पाऊण तास आणि वाहतूक कोंडी झाली तर, त्याहूनही जास्त वेळ लागत असल्याने या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून दहिसर ते मिरारोड-भाईंदरपर्यंत वाहतुकीचे पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने हे पूल बांधण्यात येणार असून प्रत्येकी ६० फुटांच्या रुंदीच्या दोन मार्गिका असलेले हे पूल आहे. दहिसर कांदळपाडा ते मिरारोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत हे पूल उभारले जाणार आहे.
पुलाच्या बांधकामासाठी २२०० कोटींचा खर्च अपेक्षित
एकूण ५ किलोमीटर लांबीचे हे पूल असून यासाठी आवश्यक असणारी जमीन ही मिठागराची आहे. त्यामुळे मिठागर आयुक्तांशी पत्रव्यवहार करून पुलासाठी आवश्यक जमिनींचे संपादन करण्याची प्रक्रीया राबवून या पूलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी सुमारे १८०० कोटी रुपये आणि ४०० कोटी रुपये जमीन संपादन अशाप्रकारे एकूण २२०० कोटी रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रीया राबवून या पुलाचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे.
सहा महिन्यांत होणार जमीन संपादन
या पुलाची निविदा मागवण्यात आली असून निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यामध्ये जमीन संपादनाची प्रक्रीया असेल. त्यानंतर पुढील सहा महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हे पूल बांधून तयार झाल्यास वाहतूक कोंडीची मोठी समस्या दूर होईल आणि टोलनाक्यापर्यंतच्या प्रवासासाठी लागणारा वेळही कमी होईल, असे प्रमुख अभियंता पूल विभाग सतीश ठोसर यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community