स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘ हर घर तिरंगा ‘ ही देशव्यापी मोहीम राबविली जात असतानाच, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी पुन्हा एकदा आपली जुनी लावून धरली आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क(शिवाजीपार्क) येथे देशभरातील सर्वांत भव्य असा राष्ट्रध्वज उभारावा, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी मुख्यंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वांत मोठा राष्ट्रध्वज उभारावा
दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मागील काही वर्षांपूर्वी शिवाजीपार्क येथे २४ तास राष्ट्रध्वज लावण्याची मागणी केली होती. परंतु तांत्रिक विविध परवानगी मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे मागणीची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परंतु आता शिवसेनेतील एक गट फुटून एकनाथ शिंदे गटात सामील झाला आणि या शिंदे गटाने भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले. या शिंदे गटामध्ये मुंबईतील शिवसेना खासदार एकनाथ शिंदे यांच्यासह १४ खासदारही सामील झाले. त्यामुळे आता राज्यात नव्या शिंदे व फडणवीस सरकार येताच आता पुन्हा एकदा शेवाळेंनी ही मागणी केली आहे.
( हेही वाचा : शिंदेंकडे नगरविकास, फडणवीस गृह आणि अर्थ मंत्रालयाचे कारभारी?)
सध्या सुरू असलेल्या ‘ हर घर तिरंगा ‘ अभियानाची प्रशंसा करत सार्वजनिक ठिकाणी २४ तास राष्ट्रध्वज लावण्याबाबत केंद्र शासनाच्या यापूर्वीच्या धोरणानुसार देशभरात अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज उभारले जात असल्याची बाब आपल्या निवेदनात नमूद केली आहे. यापुढे त्यांनी लिहिले आहे की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील शिवाजी पार्क हे एक ऐतिहासिक आणि मध्यवर्ती ठिकाण असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे साक्षीदार आहे. याठिकाणी दरवर्षी काही शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच वर्षभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लाखो नागरिक शिवाजी पार्क येथे भेट देत असतात. त्यामुळे, अशा महत्वपूर्ण ठिकाणी भव्य स्वरूपात देशभरातील सर्वांत मोठा राष्ट्रध्वज उभारावा,अशी मागणी त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community