उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जेव्हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतात तेव्हा सीमेवरील जवानांना काय वाटत असेल. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात जे तरुण हुतात्मा झाले त्यांच्या कुटुंबीयांना या प्रश्नाने काय वाटत असेल, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
तेव्हाच्या नेतृत्वात ताकद नव्हती
आमच्या सैन्यात सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमता ही नेहमीच होती. पण देशाच्या तत्कालीन नेतृत्वात आपल्या सैन्याला जा आणि स्ट्राईक करा, असे सांगण्याची ताकद नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सांगून जगाला आपल्या सैनिकांची ताकद दाखवून दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘तेव्हा मी येणार नाही’, मंत्रिमंडळ विस्तारानंतर फडणवीसांचे मिश्कील विधान)
चीनला थांबवण्याचं काम सैन्यानं केलं
काही लोक पाकिस्तान तर ठीक आहे पण चीनचं काय?असा सवाल काही टीकाकारांकडून करण्यात येतो. हजारो हेक्टरचा भारताचा भूभाग कोणाच्या काळात चीनकडे गेला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण पहिल्यांदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपल्या सैन्याने सीमेच्या बाहेर जाऊन डोखलाम येथे चीनला थांबवण्याचं काम केलं आणि चीनला माघारी परतावं लागलं ही आमच्या सैन्याची ताकद आहे, असेही गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
Join Our WhatsApp Community