साहित्य, संगीत, नाट्य व कला हे उथळ मनोरंजनाकरिता नसून, अभिरुचीपूर्ण आनंदाकरिता असतात. नाटकांच्या माध्यमातून मनोरंजन निश्चितच व्हावे, परंतु त्यासोबतच राष्ट्रीयतेची भावना व शाश्वत मानवी मूल्ये जागविण्याचे कार्य देखील व्हावे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्था (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) या संस्थेने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाच दिवसांच्या भारत नाट्य महोत्सवाचे मुंबईत आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
(हेही वाचा – नाशिकमध्ये पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू!)
काय म्हणाले राज्यपाल?
राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्राला रंगभूमीची महान परंपरा आहे. नाटकांच्या माध्यमातून थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनगाथा सांगितल्या गेल्यास युवकांना इतिहासाची माहिती होईल, तसेच राष्ट्रीय नेत्यांचे गुण आत्मसात करण्याची प्रेरणा देखील मिळेल. राष्ट्रीय नाट्य संस्थेतून अनेक प्रतिभावान कलाकार घडले आहेत. संस्थेतून यापुढे देखील प्रतिभावान कलाकार पुढे येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
(हेही वाचा – मुंबईत 9 ते 13 ऑगस्टमध्ये होणार “22 वा भारत रंग महोत्सव”)
उदघाटन सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक, ज्येष्ठ रंगकर्मी व केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाच्या सदस्या वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाट्य संस्थेचे (एनएसडी) संचालक रमेश चंद्र गौड व पु ल देशपांडे अकादमीचे संचालक संतोष रोकडे उपस्थित होते.
मुंबईने सर्व दिले
– अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने आयोजित केलेला नाट्य महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे आणि तो तरुण पिढीसाठी प्रेरणादायक आहे, असे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी यावेळी सांगितले.
– सन १९७९ साली आजच्या दिवशीच आपण राष्ट्रीय नाट्य संस्थेतून पदवी प्राप्त करून मुंबईत आलो होतो. संस्थेने आपल्याला प्रेम दिले, जीवन दिले, कुटुंब दिले आणि जीवन शिक्षणही दिले, असे सतीश कौशिक यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community