चंद्रपूर जिल्ह्यातील सेंट्रल चांदा विभागातील विहिरगाव वनक्षेत्रातून जाणा-या रेल्वे ट्र्रॅकवर बुधवारी सकाळी वाघाचा छिन्नाविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. ब्रिटिश काळात बांधलेल्या या रेल्वे ट्रॅकवर रात्री रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्राणीप्रेमींनी व्यक्त केला. मात्र मृतदेह रेल्वेट्रॅकवरच पडून राहिल्याने रात्रीच्या वेळी रेल्वेमार्गावरून जाणा-या सर्वच रेल्वेगाड्या वाघाच्या मृतदेहावरुन गेल्याने सकाळी छिन्नाविछिन्न अवस्थेत वाघाचा मृतदेह रेल्वेच्या अधिका-यांना सापडला.
सकाळी नऊच्या सुमारास वाघाच्या तुकड्यांचे अवशेष रेल्वेमार्गावर आढळून आले. वाघाचा पंजा, पोटाकडची चरबी, पायाचा तुकडा वेगवेगळ्या भागांत रेल्वे मार्गावर आढळला. पोटाकडच्या चरबीचा सर्व भागच बाहेर आला होता. या रेल्वेट्रॅकवरुन दक्षिणेला रेल्वे जातात. नुकताच गोंदिया जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी वाघाचा छिन्नाविछिन्नावस्थेत मृतदेह आढळल्यानंतर या रेल्वेमार्गातून तिसरी रेल्वेलाईन टाकण्यापूर्वी आवश्यक काळजी घेण्याची गरज वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली.
( हेही वाचा: बेस्टच्या कंडक्टरला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सहा महिन्यांची शिक्षा )
Join Our WhatsApp Community
तिसरी रेल्वेलाईन टाकण्यापूर्वी वन्यप्राण्यांचे रेल्वेला धडक लागून होणारे मृत्यू टाळता यावेत, यासाठी आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे. वन्यप्राण्यांची ज्या भागांतून ये-जा सुरु आहे. त्या भागांतून वन्यप्राण्यांसाठी रेल्वे मार्गाच्या खालून जाणारा रस्ताही तयार करावा. -बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया