हवाई गुप्तचर विभागाने दुबईहून आलेल्या एका सुदान नागरिकाला सोने तस्करी प्रकरणात विमानतळावर अटक करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या सुदान नागरिकाने सोने तस्करी करण्यासाठी लढवलेली शक्कल बघून, हवाई गुप्तचर विभागाचे अधिकारीदेखील अचंबित झाले. या तस्कराने चक्क मेणाच्या गोळ्यात सोनं दडवून हा मेणाचा गोळा स्वतःच्या खाजगी भागात दडवला होता अशी माहिती समोर आली आहे.
हवाई गुप्तचर विभागाने सुदान नागरिकासह आणखी ६ जणांना अटक केली आहे. या सहा जणांनी सोन्याच्या तस्करीसाठी महिलांचे हेअर पिन तसेच लॅपटॉप, मनगटी घड्याळ आणि स्पीकर, स्प्रेच्या बॉटल यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. हवाई गुप्तचर विभागाने एकूण ७ जणांना सोने तस्करी प्रकरणी अटक करून सुमारे ३ कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.
( हेही वाचा: खासगी बसप्रवास महागला; सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे फुल्ल! )
ताहा अबुझैद एल्सिद्दीग इलावाद नावाचा सुदानी नागरिक दुबईहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आला होता. ताहा हा ग्रीन कॉरिडॉरमधून बाहेर पडला. मानवी स्कॅनिग मशीनमध्ये त्याच्या शरीरात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. परंतु त्याच्या संशयास्पद हालचालींवर अधिका-यांचे लक्ष गेले आणि त्याला तपासासाठी एका खोलीत आणले व त्याची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्याला चेक केले असता त्याच्या शरिरातील खाजगी भागात अधिकऱ्यांना मेणाचा गोळा सापडला. त्यांनी त्याची तपासणी केली असता या मेणाच्या गोळ्यात सोने आढळून आले. या तस्कराने २२ लाख ४८ हजार रुपये किंमतीचे ४९६ ग्रॅम सोने मेणात दडवून आणले होते.
हवाई गुप्तचर विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मेणातून सोनं लपवून आणणे ही पद्धत खूप जुनी आहे. पूर्वीचे तस्कर या पद्धतीने सोन्याची तस्करी करत होते. मेणात सोने दडवल्यामुळे मानवी स्कॅनर मशीनमध्ये मेणाच्या आतील सोने दिसून येत नाही किंवा मेटल डिटेक्टरमध्ये मेणातील मेटल किंवा सोने शोधू शकत नाही.
Join Our WhatsApp Community