शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतलेले शिंदे समर्थक नऊ मंत्री गुरुवारी 11 जुलैला एकत्रितपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी पोहोचले. मंत्रीपद मिळाल्यानंतर, शिंदे गटातील सर्व नऊ मंत्री एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले. यावेळी शिवाजी पार्क परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांचे अभिनंदन करणारे आणि स्वागताचे पोस्टर्स शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत.
बाळासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जाणार
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर,कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशिर्वाद घेण्यासाठी स्मृतीस्थळी आल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर म्हणाले. बाळासाहेबांचे महाराष्ट्रासाठी असणारे विचार, त्यांच्या योजना या प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आणि आमचे सहयोगी भाजप आणि त्याचे नेते देवेंद्र फडणवीस हे सर्व कटीबद्ध आहोत. त्यामुळे ख-या अर्थाने बाळासाहेबांचा विचार घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्याच्यादृष्टीने आम्ही आज सर्वजण बाळासाहेबांना नमन करण्यासाठी आलो आहोत. तसेच त्यांचे आशिर्वाद घेऊनच आम्ही कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे, केसरकर यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: रस्त्यांच्या नव्या निविदांबाबत अनेक तर्क विर्तक )
शिंदे गटातील नऊ नवनियुक्त मंत्री
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- संजय राठोड
- संदीपान भुमरे
- उदय सामंत
- तानाजी सावंत
- अब्दुल सत्तार
- दीपक केसरकर
- शंभूराज देसाई