भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार मुंबईत महापालिकेच्यावतीने घरोघरी तिरंगा वाटप करण्यात आले आहे. मात्र तिरंग्याबरोबरच काठी पण द्या, अशी मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे. मुंबई महापालिकेने काठी देणे शक्य नसल्याचे, स्पष्ट केले असून लोकसहभागातून काठ्यांचा पुरवठा करावा किंवा लोकांनी किमान काठीची सोय करावी, अशी अपेक्षा पालिका अधिका-यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबईत या अभियानाची अंमलबजावणी पालिका प्रशासनातर्फे होत असून, संपूर्ण मुंबईत 50 लाख ध्वज उभारले जातील, असे नियोजन केले जात आहे. पालिकेच्यावतीने 35 लाख राष्ट्रध्वजांचे मोफत वितरण केले जात आहे. विविध आस्थापने आणि व्यावसायिक इमारती असे मिळून 50 लाख ध्वज लावण्यात येणार आहेत.
( हेही वाचा: पवारांचा पाठिंबा तर पाटलांचा विरोध, विरोधी पक्षनेतेपदवरुन राष्ट्रवादीत दुमत )
पालिकेने घरोघरी तिरंगा वाटप केले असून, 11 ऑगस्टपर्यंत तिरंगा वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. पालिकेने विशेषत: झोपडपट्टी परिसरात तसेच रहिवाशांमध्ये ध्वजाचे वाटप केले आहे. मात्र या ध्वजासोबत काठी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र काठी देणे शक्य नसून, लोकसहभागातून काठी द्यावी, असे आवाहन आम्ही लोकप्रतिनिधींना केले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली.
Join Our WhatsApp Community