गेल्या महिन्याभरापासून रखडलेला राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अखेर 9 ऑगस्ट रोजी झाला आहे. या मंत्रीमंडळात अनेक नेत्यांना संधी न देण्यात आल्यामुळे भाजप आणि शिंदे गटात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वांनाच समाधानी करता येत नाही
मंत्री होण्याइतकी माझी पात्रता नसेल, त्यामुळे पक्ष नेतृत्वाला जेव्हा वाटेल की माझी पात्रता आहे तेव्हा मला मंत्रीपद देतील. त्यामुळे याबाबत माझा काही आक्षेप नाही,असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मंत्रीमंडळ विस्तारात सर्वांनाच समाधानी करता येत नाही. त्यामुळे मंत्रीपद मिळालेल्या मंत्र्यांनी जनतेचं समाधान करावं, असं सांगत पंकजा मुंडे यांनी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
(हेही वाचाः ‘शिवबंधन बांधा आणि घरी बसा असं मला सांगण्यात आलं होतं’, रामदास कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल)
महिलांना संधी द्यायला हवी
मंत्रीमंडळात महिला नक्कीच असायला हव्यात. तसेच महिलांना केवळ महिला बालकल्याण किंवा इतर खाती न देता त्यांना जास्तीत जास्त चांगल्या खात्यांची जबाबदारी देण्यात यावी, असा माझा आग्रह आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढच्या मंत्रीमंडळात महिलांना नक्कीच स्थान देण्यात येईल, अशी आशाही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
ओबीसी आरक्षणाचे रक्षण करावे
रक्षाबंधनच्या निमित्ताने गुरुवारी पंकजा मुंडे यांनी रासप आमदार महादेव जानकर यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षम करावे, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community