आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊ भाजपने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने आपल्या कार्यकारिणीत मोठे बदल करत मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आता शेलार पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप भ्रष्टाचारी शिवसेनेला मुंबई महापालिकेतून तडीपार करणार असल्याची घोषणा आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
शिवसेना हात झटकू शकत नाही
भाजपचे मुंबई अध्यक्ष होताच आशिष शेलार यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी माजवली आहे त्याला तडीपार करण्याचे काम भाजप करणार आहे. मुंबई महापालिकेत वर्षानुवर्ष ज्या कंत्राटदारांना पोसलं आणि कंत्राटदारांनी ज्यांना पोसलं ते खड्ड्यांपासून हात झटकू शकत नाहीत. तसेच कोस्टल रोडचं निकृष्ट दर्जाचं काम आणि मेट्रो-3 मध्ये केलेला अहंकार यांमुळे मुंबईकरांचं जे नुकसान झालं आहे त्यापासून शिवसेना हात झटकू शकत नाहीत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
(हेही वाचाः वॉर्ड पुनर्रचना रद्द केल्याप्रकरणी शिवसेनेची न्यायालयात धाव)
भाजपचाच महापौर बसणार
गेल्या 25 वर्षांपासून मुंबईबाबत जनतेने एक चित्र रंगवलं आहे. ते चित्र जपण्याचा आणि साकारण्याचं काम आता भाजप करणार आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून हुसकावून लावत मुंबईच्या ख-या विकासाचं चित्र आम्ही मुंबईकरांना सुपूर्द करणार आहोत. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार असून त्यासाठी आवश्यक ते सर्व नगरसेवक निवडून आणू, असा विश्वास देखील आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community