मुंबई मेट्रो १ ला आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत. या आठ वर्षात मुंबई मेट्रोने ७४ कोटी लोकांना सेवा दिली. २ हजार ७७६ दिवस अपघात मुक्त सेवा, प्रवासादरम्यान विविध ऑफर यामुळे मुंबईकरांची मेट्रोला पसंती मिळत आहे. मुंबई मेट्रो १ ने देशभरातील सर्व आगामी मेट्रो मार्गांसाठी एक उच्च बेंचमार्क सेट केला आहे. यंदा स्वातंत्र्यादिनी मुंबई मेट्रोमधून शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे.
( हेही वाचा : पुणे महापालिकेच्या भरतीसाठी तब्बल ८७ हजार अर्ज)
विद्यार्थ्यांना करता येणार मोफत मेट्रो प्रवास
आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेनुसार मुंबई मेट्रो वनने १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यदिनी, गणवेश परिधान केलेले शालेय विद्यार्थी पैसे न देता मेट्रोची सफर करू शकतील. या विद्यार्थ्यांना कोणतेही भाडे आकारले जाणार नाही.
शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो सेवा देण्यासोबतच, मुंबई मेट्रो वनने हर घर तिरंगा या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. मेट्रोमध्ये आयोजित केलेले विविध कार्यक्रम…
- मेट्रो मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन.
- सर्व १२ मेट्रो स्थानकांवर ध्वजारोहण.
- मेट्रो स्टेशनमधील सर्व डिजिटल स्क्रीनवर स्वातंत्र्याशी संबंधित व्हिडिओ प्रवाशांना दाखवले जातील.
- सर्व स्थानकांवर तिरंगी फुग्यांची सजावट.
मुंबई मेट्रो वन भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत सेवा देणार आहे त्यामुळे मेट्रो अलाइनमेंटमध्ये आणि आजूबाजूला राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मेट्रोकडून करण्यात आले आहे.
मेट्रोची वैशिष्ट्ये
- सध्याच्या आठवड्यातील रायडरशिप = ३ लाख ५० हजार
- आठवड्यातील फेऱ्या = ३५६
- पीक अवर्स दरम्यान मेट्रोची वारंवारता ४ मिनिटांपेक्षा कमी असते.
- वर्सोवा आणि घाटकोपरहून पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता आहे.
- वर्सोव्याहून शेवटची मेट्रो रात्री ११.१९ वाजता आहे
- घाटकोपरहून शेवटची मेट्रो रात्री ११.४४ वाजता धावते.