भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व शासकीय कार्यालये विद्युत रोषणाई आणि अन्य तिरंग्यांच्या रंगानी सजून गेली आहे. महापालिका मुख्यालयावरही तिरंग्याची सजावट करण्यात आली असून मुख्यालयातील विविध कार्यालये तिरंग्यांच्या रंगांनी न्हावून गेलेली असताना महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात मात्र, तिरंग्याची कोणतीही सजावट केली नाही तर त्या रंगाचे झेंडे, फुगे लावण्यात आले नाही. त्यामुळे ज्या महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध कार्यालयांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगी रंगांची सजावट केली केली तिथे आयुक्तांचे आपल्याच कार्यालयात दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबण्यात येत असून या निमित्त महापालिकेत मुंबईमध्ये सुमारे ४० लाख राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून खासगी इमारतींना विद्युत रोषणाईचे आवाहन केले जात असून त्यानुसार इमारतींवर तिरंग्याच्या रंगाची विद्युत रोषणाई केली जात आहे.
महापालिका आयुक्तांच्या आवाहनानंतर मुख्यालयासह इतर महापालिका कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या रंगाची सजावट केली जात आहे. त्यानुसार मुख्यालयातील महापालिका लेखा विभाग, महापालिका सचिव विभाग, सहआयुक्तांचे कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्तांचे कार्यालय, मालमत्ता विभाग, देखभाल विभाग, पापुमनी विभाग, सामान्य प्रशासन विभागांमध्ये तिरंगी फुगे, झेंडे, पताके आदींचा वापर करत सजावट केली. महापालिका सचिव विभागाने भारताचा नकाशासह उत्सव स्वातंत्र्यांचा… उत्साह महापालिका सचिव कार्यालयाचा असा संदेश देत उत्कृष्ट सजावट केली. महापालिका सचिव कार्यालयासह व्हरांड्यातही आकर्षक सजावट केल्याने इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी सेल्फी साठी या विभागात गर्दी होत होती.
मात्र, एका बाजुला इतर विभागांमध्ये सजावट करण्यात आलेली असताना आयुक्तांच्या कार्यालयासह आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा भारतीय तिरंग्याचा ध्वज नाही की अन्य प्रकारच्या तिरंगी रंगाची सजावट केलेली दिसली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या कार्यालयात अमृत महोत्सवी वर्षांचे वातावरण पहायला मिळत नसल्याने सर्वांचाच चर्चेच विषय ठरत होते.
Join Our WhatsApp Community