नव्या सरकारमध्ये सर्वात श्रीमंत मंत्री कोण?

115

आलिशान बंगले, गाड्या आणि फौजफाट्यासह दिमाखात फिरणाऱ्या मंत्री, आमदारांकडे पाहिले, की यांच्याकडे नेमका किती पैसा असेल, असा विचार प्रत्येकाचा मनात डोकावतो. राज्यात अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकांच्या मनात हा विचार रुंजी घालून गेला. त्या प्रत्येकासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने घेतलेला हा विशेष आढावा…

( हेही वाचा : आशिष शेलार लांब उडीत बाद)

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात नव्याने १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील प्रत्येक मंत्री कोट्याधीश असून, भाजपचे मंगलप्रभात लोढा ४४१ कोटींसह पहिल्या स्थानावर आहेत. त्याखालोखाल शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचा नंबर असून, त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात आपल्याकडे ११५ कोटींची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते तथा कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर ८२ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

भाजपच्या कोट्यातून मंत्री झालेल्या विजयकुमार गावित यांच्या नावावर २७ कोटींची संपत्ती आहे. या व्यतिरिक्त शिंदे गट आणि भाजपमधील एकाही मंत्र्याकडे २५ कोटींहून अधिक संपत्ती नसल्याचे त्यांनी शपथपत्रातून जाहीर केले आहे. शिवसेनेचे पैठणमधील आमदार तथा कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेले संदीपान भुमरे या यादीत सर्वात खालच्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे केवळ २ कोटींची मालमत्ता आहे.

कोणाकडे किती संपत्ती?

भाजपचे मंत्री

मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) – ४४१ कोटी
विजयकुमार गावित (नंदूरबार पूर्व) – २७ कोटी
गिरीश महाजन (जामनेर) – २५ कोटी
राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी) – २४ कोटी
अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) – २२ कोटी
सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) – ११.४ कोटी
रवींद्र चव्हाण (डोंबिवली) – ९ कोटी
चंद्रकांत पाटील (कोथरूड) – ५.९९ कोटी
सुरेश खाडे (मिरज) – ४ कोटी

शिवसेनेचे मंत्री

  • तानाजी सावंत (परांडा) – ११५ कोटी
  • दीपक केसरकर (सावंतवाडी) – ८२ कोटी
  • अब्दुल सत्तार (सिल्लोड) – २० कोटी
  • शंभुराज देसाई (पाटण) – १४ कोटी
  • दादा भुसे (मालेगाव बाह्य) – १० कोटी
  • संजय राठोड (दिग्रस) – ८ कोटी
  • गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) – ५ कोटी
  • उदय सामंत (रत्नागिरी) – ४ कोटी
  • संदिपान भुमरे (पैठण) – २ कोटी

शिंदे-फडणवीसांकडे किती मालमत्ता?

सरकारचे नेतृत्त्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर ११ कोटी ५६ लाखांची मालमत्ता असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३.७८ कोटींचे धनी आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे १४३ कोटी २६ लाखांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.