कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्लीमध्ये मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच शनिवारी पंजाबमध्ये देखील मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन केले आहे.
(हेही वाचा – राजधानी दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती, दंडात्मक कारवाईचे आदेश )
देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या भारतात 1 लाख 19 हजार 264 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 20 हजार 18 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 35 लाख 93 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 20,018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 4.36 टक्के आहे.
राज्य सरकारकडून नियमावली जारी
यापार्श्वभूमीवर पंजाब सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कोरोना गाइडलाईनमध्ये सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्याबाबातही सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, सर्व नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस अथवा बूस्टर डोस घेण्याबाबातही आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी तात्काळ चाचणी करावी, तसेच विलगीकरणात राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी धुंकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मागील 24 तासांत पंजाबमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्येही मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात येईल, असाही निर्णय दिल्ली सरकारने घेतलाय.
Join Our WhatsApp Community