स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रांगणात सावरकर स्मारक आणि स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रभक्ती समिती यांच्याद्वारे उद्या सोमवार, दि. १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी म्हणजे भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप कॅप्टन निलेश देखणे उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, छत्रपती शिवाजी उद्यान, दादर, मुंबई येथे हा सोहळा होणार आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्त खास कार्यक्रम
यामध्ये सकाळी ९ वाजता ग्रुप कॅप्टन निलेश देखणे यांच्याहस्ते ध्वजारोहण केले जाईल. त्यानंतर मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिवाजी उद्यान परिसरात संचलन होईल. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या या ७५ व्या दिनानिमित्त खास कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
मॅरेथॉन रक्तदान शिबीराचेही आयोजन
यामध्ये आपल्या क्रांतिकारकांनी घडवलेल्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाची साक्ष देणारी गाणी, नृत्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक प्रसंगांचे अभिवाचन होणार आहे. यात श्रीरंग भावे, मयूर सुकाळे, केतकी भावे- जोशी, गुरुराज कोरगावकर, दिशा देसाई, पूर्वी भावे, कलांगणचे विद्यार्थी सहभागी असतील . याशिवाय मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची साहसी प्रात्यक्षिकेही सादर होतील. यावेळी दिग्पाल लांजेकर आणि तुषार दळवी यांचा विशेष सहभाग असणार आहे. याशिवाय सावरकर स्मारकामध्ये सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई अल्ट्रा आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मॅरेथॉन रक्तदान शिबीरही आयोजित केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community