आज आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असलो, तरी गेल्या ७५ वर्षांत भारताने वेगवेगळ्या आव्हानांवर मात करीत जागतिक महासत्तांच्या रांगेत आपले स्थान निर्माण केले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करीत आपण मोठी प्रगती केली असून, अणुऊर्जेच्या बाबतीतही आपण आत्मनिर्भर झालो आहोत. विकसनशील देश असलेल्या भारताला सुरुवातीच्या काळात कोणत्याही देशाकडून अणुऊर्जेचे तंत्रज्ञान मिळण्याची उमेद नव्हती. किंबहुना जागतिक स्तरावरील अनेक बंधनांमुळे आपण कोणाकडे मागणीही करू शकत नव्हतो. पण आज आपण अणुशक्ती या विषयात स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर झालो आहोत. ही आत्मनिर्भरता केवळ आपल्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून प्राप्त झालेली आहे.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात असा होणार स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा!)
‘शून्य उत्सर्जना’च्या दिशेने सर्वांची वाटचाल सुरू
प्राप्त परिस्थितीत ऊर्जा ही मानवी जीवनातील महत्त्वाची बाब बनली आहे. दुसरीकडे, वातावरण बदलाचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. अलीकडे ‘शून्य उत्सर्जना’च्या दिशेने सर्वांची वाटचाल सुरू झाली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अणुशक्तीचे अनन्य साधारण महत्त्व आहे, अशी माझी ठाम धारणा आहे. कारण मी स्वतः त्याची आकडेमोड करून पाहिली आहे. एका बाजूला कार्बनडायऑक्साईड सोडायचा नाही आणि दुसऱ्या बाजूने विकास सुरू ठेवायचा, असा विचार आपण करतो आहोत. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करायची झाल्यास अणुशक्तीशिवाय पर्याय नाही. अन्नधान्य, आरोग्य, कॅन्सर उपचार, कचऱ्यावर प्रक्रिया अशा अनेक क्षेत्रात अणुशक्ती उपयोगाला येत असून, देशभरात तिचा वापर वाढला आहे.
- डाॅ. अनिल काकोडकर, अणुऊर्जा तज्ज्ञ.