वीर सावरकर : क्रांतिकारक, देशभक्तांचे प्रेरणास्थान!

365

४  मार्च १९६६ रोजी दिल्ली सिटिझन्स कौन्सिलच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली वाहण्याकरिता घेतलेल्या सभेमध्ये तत्कालीन केंद्रीय संसदीय कामकाज आणि दळणवळणमंत्री सत्यनारायण सिन्हा म्हणाले, ‘Savarkar would continue to inspire the coming generations. He was a combination of many qualities besides being a social reformer.’

सावरकर मित्रांशी मनमोकळेपणाने वागत

वीर सावरकरांच्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण म्हणजे प्रेरकता. सत्यनारायण सिन्हा यांच्या विधानातील inspire हा शब्द महत्त्वाचा आहे. सावरकरांच्या अंगीभूत असणाऱ्या अनेक असामान्य आणि अद्भूत गुणांमुळे त्यांच्यावर बालपणापासून नेतृत्व स्वीकारण्याची जबाबदारी आलेली आहे. सावरकर मित्रांशी मनमोकळेपणाने वागत. पण त्यांच्या मित्रांच्या मनात सावरकरांविषयी आदर होता. त्यांचे बालपणीचे मित्र देखील मनोमन त्यांना गुरु मानत. भगूर येथील त्यांचे बालमित्र राजाराम शिंपी त्यांच्या प्रेरणेने देशभक्त झाले. आबा पांगळे, डॉ. वि. म. भट हे त्यांचे मित्र तर होते, परंतु त्यांचे अनुयायी देखील होते. त्यांच्या एकनिष्ठ अनुयायी मित्रांमध्ये भिकू वंजारी, गोपाळराव देसाई, रामभाऊ दातार, वामन घोपावकर, डॉ. आठल्ये अशा अनेक मित्रांचा समावेश आहे. ही यादी खूपच मोठी आहे. श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा हे सावरकरांपेक्षा वयाने ज्येष्ठ असले तरी त्यांच्या मनात देखील या तरुण मुलाबद्दल विशेष आदर होता. लंडनमधील क्रांतिकार्यातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे ते सेनापती होते. अय्यर, येरुलकर, राणासाहेब, मदनलाल धिंग्रा, सरदार अरजितसिंह, सेनापती बापट असे तरुण वयातील सहकारी त्यांचे अनुयायीच होते. अंदमानात भेटलेले इंदुभूषण रॉय, उल्हासकर दत्त, नानी गोपाळ, भाई परमानंद इत्यादी लोक सावरकरांचे सहकारी झाले. सावरकरांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण होतं, एक वेगळीच जादू होती. त्यांच्या सानिध्यात आलेली व्यक्ती देशभक्त होऊन जायची. आपल्या मित्रांबद्दल सावरकर लिहितात, ‘माझा मित्र म्हटला की, तो स्वदेशी वस्तू वापरणारा, स्वदेशाभिमानात रंगलेला, स्वातंत्र्याची निदान मानसिक तळमळ तरी लागलेला-बहुधा मित्रमेळ्याचा सभासद झालेला असावयाचा.’  पूर्वी नाशिकमधील त्यांच्या मित्रांचा वेळ आजच्या भाषेत सांगायचे तर टाईमपास करण्यात जायचा. सावरकरांनी त्यांना राष्ट्र जाणीवेची प्रेरणा दिली. अंदमानमध्ये देखील जे बंदिवान रविवारच्या सुट्टीत जुगार खेळण्यात, टिंगल टवाळी, शिव्या देण्यात वेळ घालवायचे ते सावरकरांच्या सहवासात आल्यानंतर पुस्तके वाचू लागले, चर्चा करु लागले आणि देशभक्तीची गाणी गाऊ लागले.

(हेही वाचा राज्‍यात शासकीय कार्यालयांत ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात)

आजही अनेक लोक सावकरांच्या प्रेरणेतून समाजसेवा आणि देशसेवा करतात

सावरकरांनी चापेकर बंधूंकडून प्रेरणा घेऊन भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतीची प्रतिज्ञा घेतली. १८९१ मध्ये ‘राष्ट्रभक्त समूह’ या नावाने संघटना सुरु केली. पुढे या संघटनेचं रुपांतर ‘मित्रमेळा’मध्ये झालं. मग मित्रमेळ्याचं रुपांतर ‘अभिनव भारत संस्था’मध्ये झालं. अभिनव भारत संस्थेतून अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक निर्माण झाले. या संघटनेतील मिर्झा अब्बास हयात खान यांनी भारतात शस्त्रे व पिस्तुले पाठवली होती असा उल्लेख आढळतो. सेनापती बापट आणि बंगालचे हेमचंद्र दास हे सावरकरांच्या सांगण्यावरुन पॅरिसला गेले. तिथे बॉम्ब बनवण्याची तांत्रिक माहिती असलेले रशियन पुस्तक मिळवले. अन्या नावाच्या रशियन मुलीने त्याचे इंग्रजीत भाषांतर करुन दिले. बापटांनी बॉम्ब बनवण्याची पद्धत शिकून घेतली आणि सावरकरांच्या प्रेरणेने महाराष्ट्र, बंगालच्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारला हादरे दिले. अनंत कान्हेरेना सावरकरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नसला तरी त्यांनी पेटवलेली क्रांतीची ज्योत सर्वत्र प्रज्वलित झाली होती. त्यातून अनेक क्रांतिकारक घडले. अनंत कान्हेरे हे त्यातलेच एक क्रांतिकारक. वयाच्या १८ वर्षी त्यांनी हौताम्य पत्करले. लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा नावाचा त्यांचा सहकारी हा ऐशोआरामाचं जीवन जगत होता. सावरकरांच्या संपर्कात आल्यानंतर तो देशभक्त झाला. त्याची सावरकरांशी ओळख झाली आणि मातृभूमीच्या चरणी इंग्रज नावाच्या बोकडाचं रक्त अर्पण करणारा एक हुतात्मा तयार झाला. हे सावरकरांचं वैशिष्ट्य होतं. भगतसिंग यांच्या मनात सावरकरांविषयी प्रचंड आदर होता. १८५७चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाच्या प्रति छापून त्यांनी क्रांतियुद्धाचा वैचारिक प्रचार केला होता. सुभाषचंद्र बोस यांनी देखील सावरकरांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने भारताच्या बाहेर जाऊन आझाद हिंद फौज उभी केली. सावरकरांचे जगभरातल्या क्रांतिकारकांशी संबंध होते. १८५७चे स्वातंत्र्यसमर हा त्यांचा ग्रंथ देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनेक क्रांतिकारकांसाठी आधुनिक गीता ठरला. १८५७च्या स्वातंत्र्यसमरामुळे ब्रिटिशांच्या मनात भारतीय क्रांतिकारकांविषयी एक प्रकारची भिती निर्माण झाली आणि हा ग्रंथ ब्रिटिश साम्राज्याचा कर्दनकाळ ठरला. १८५७ मधील क्रांतिकारकांचा ब्रिटिंशांनी दक्षिण भारतातील सैनिकांच्या मदतीने पाडाव केला. पण सावरकरांनी लिहिलेल्या या ग्रंथाचा प्रभाव इतका होता की, १९०८ मध्ये मद्रासमधील तुतिकोरीन येथील स्वदेशी आंदोलनात लोकांनी कलेक्टर, मुन्सफ, पोलीस यांची परदेशी न्यायालये उध्वस्त केली. दक्षिण भारतीय क्रांतिकारकांनी पॉंडेचेरी येथे अभिनव भारताची शाखा स्थापन केली. निळकंठन अय्यर यांनी १८५७चे स्वतंत्र्यसमर याविषयी गौरोद्गार काढलेले आहेत. सावरकरांकडून प्रेरणा घेतलेल्या क्रांतिकारकांची व देशभक्तांची यादी खूप मोठी आहे आणि त्यांचे कार्य खूप महान आहे. आजही अनेक लोक सावकरांच्या प्रेरणेतून समाजसेवा आणि देशसेवा करीत असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.