वीर सावरकरांच्या जीवन प्रेरणा…

481

गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठतो हे तर खरेच आहे. परंतु काही जण, आपण गुलाम झालेलो आहोत याची जाणीव, उपजतच घेऊन येतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात तशा प्रकारची जाणीव देणारा, धक्का देणारा एकही प्रसंग घडत नाही. तरीही त्यांची स्वातंत्र्याची प्रेरणा अंतरात्म्यात जागृत झालेली असते. याचे ठळक उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! भारताचे स्वातंत्र्य आंदोलन आणि सावरकर ही अभिन्न जोडी आहे. सावरकरांना वगळून भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही.

सावरकरांना स्वतःला व्यक्तिशः कसलेही स्वातंत्र्य मिळवायचे नव्हते. बुद्धी, रूप, वक्तृत्व, लेखन अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे त्यांचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य ते सहजच सुखी आणि संपन्न करू शकले असते. सरकारी नोकरी किंवा बॅरिस्टरी करून भरपूर पैसा-अडका आणि मान-मरातब मिळवू शकले असते. तरीही त्यांनी तो सुखाचा सहज मार्ग सोडून देऊन वयाच्या केवळ १४व्या वर्षी ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली.

“स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे”

स्वतंत्रतेचे परिपूर्ण वर्णन करणारे हे एक महान काव्य त्यांनी रचले. स्वातंत्र्य ही प्रेरणा सावरकरांच्या आयुष्यात इतकी महत्त्वाची होती की त्या स्वतंत्रता देवीचे वर्णन करतानासुद्धा त्यांनी वेदांता मध्ये सांगितलेल्या मोक्ष आणि मुक्ती यांना सुद्धा तिचीच रुपे असे म्हटले. ‘स्वातंत्र्यासाठी मरणं, हेच खरं जगणं आणि स्वातंत्र्या विना जगणं हेच मरणं’ अशा अद्भुत ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. स्वातंत्र्याची उत्कट इच्छा, त्यासाठी अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर किंवा जोसेफ मॅझिनीच्या आत्मवृत्ताची प्रस्तावना आणि भाषांतर यासारखे क्रांतिकारकांना प्रेरक झालेले साहित्य लिहिणे, पोवाडे व अन्य स्फूर्तिदायक काव्य लिहिणे आणि अभूतपूर्व अशी काळे पाणी ही शिक्षा दोनदा मिळणे, या सर्व घटना त्यांच्या स्वातंत्र्य प्रेमाच्या साक्षी आहेत. १४ वर्ष प्रत्यक्ष कैदेत आणि १४ वर्ष स्थानबद्धतेत अशी २८ वर्ष जन्मठेप त्यांनी भोगली. स्थानबद्धतेच्या काळात सुद्धा त्यांची आपल्या स्वतःच्या समाजासाठी काम करण्याची इच्छा संपली नाही. ते नुसते बोलके नाही तर कृतिशील समाजसुधारक होते.

भारताबाहेरही मानव जातीत समता यावी अशी इच्छा 

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही फ्रेंच राज्यक्रांतीची तत्त्वे त्यांच्या अंगात बाणली होती. देशाने आणि मनुष्याने स्वतंत्र होऊन करायचे काय तर त्याचे उत्तरही ते एका काव्यात देतात. सावरकर या काव्यात म्हणतात ‘कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला’ आता हे रण/संघर्ष कशासाठी याचे उत्तरही ते लगेचच पुढच्या ओळीत देतात, ‘‘समतेच्या ममतेच्या सृजन रक्षणाला’’ अर्थात भारतीय समाजामधली अंतर्गत समता जशी त्यांना प्रिय होती तशी भारताबाहेरही मानव जातीत समता यावी इतकं उच्च कोटीतील त्यांचे उद्दिष्ट होते. याच काव्यात ते पुढे म्हणतात ‘‘होऊनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता’’

भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेपाठोपाठ सावरकर जसे समतेच्या तत्त्वाने कार्य करतात तसे स्वातंत्र्य आणि समता साध्य करण्यासाठी बंधुत्व, एकमेकांविषयी प्रेमभावना असणे हे सुद्धा आवश्यक होते. बंधुत्व हे तत्व सुद्धा त्यांच्या जीवन प्रेरणेचे उद्दिष्ट होते. हिंद्वेतर भारतीय समाजाला ‘याल तर तुमच्या सह, चला आपण एकत्र येऊन धर्म निरपेक्ष जातीविरहित असे राष्ट्र घडवू’ हेच त्यांचे अन्य समाजाला आवाहन होते. तर त्याच वेळी हिंदू समाजालाही “तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू” असे म्हणत हिंदू समाजातून जातिभेद अमंगळ मानून त्याबरोबरच अस्पृश्यता नष्ट करण्याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न केला. स्वराज्याबरोबर सुराज्य असावे हा त्यांचा दृष्टिकोन अभिनव भारताच्या स्थापनेपासूनच होता. त्यांच्या डोळ्यांपुढचा स्वतंत्र भारत हुकूमशाही किंवा राजेशाही मार्गावर जाणारा नव्हता. त्यांच्या अभिनव भारत संघटनेच्या घटनेत लोकशाही, प्रजातंत्राची स्थापना हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट गणले गेले होते. थोडक्यात स्वातंत्र्याच्या प्रेरणेबरोबरच सावरकर लोकशाहीवादी सुद्धा होते ब्रिटिशांच्या कैदेतून आणि स्थानबद्धतेतून, त्यांनी घातलेल्या सर्व अटींमधून पूर्णपणे सुटल्यानंतर त्यांनी हिंदु महासभा या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदावरून लोकशाहीचीच कास धरली.

त्याआधी सशस्त्र क्रांतीचे कार्य म्हणजे गुप्तपणे कार्य करणे, गुप्त मंडळी चळवळ चालवणे ही त्यांची कार्यशैली होती. गुप्तता हा त्यांच्या सशस्त्र क्रांतीकार्याचा अविभाज्य भाग होता. तो त्यांनी संपूर्ण बदलून लोकशाहीचा स्वीकार केला, प्रकट कार्य ते करू लागले. हिंदू महासभेतील अंतर्गत निवडणुकांना आणि काँग्रेस मुस्लिम लीग विरुद्ध निवडणूक लढवून त्यांनी या ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत चालू झालेल्या भारतीय लोकशाहीच्या प्रवासामध्ये भाग घेतला. स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची राजकीय पक्षांसाठीची आचारसंहिता कशी असावी यावर सुद्धा त्यांनी एक लेख लिहिला आहे. ती आचारसंहिता आज सुद्धा अतिशय आदर्श ठरावी अशीच आहे.

अंतिम उद्दिष्ट मानवतावाद

पण मग सावरकरांच्या या स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रवासाचा शेवट तरी काय होता? तर सावरकरांच्या या प्रवासाचे अंतिम साध्य होते, मानवतावाद! सर्व मानव एक आहेत, माझ्या हिंदुत्वाच्या सीमा या त्रैलोक्याच्या सीमा असे ते हिंदुत्व या ग्रंथाचा शेवट करताना लिहितात. भारतीय स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या गॉय अल्ड्रेड या मानवतावादी ब्रिटिश मित्राला लिहिलेल्या पत्रात त्यांनी मानवतावाद हेच माझे अंतिम ध्येय असून राष्ट्रवाद हा सध्याचा वास्तव म्हणून स्वीकारलेला केवळ एक टप्पा आहे असे आवर्जून लिहिले आहे. सावरकरांचे हे मानवतावादी दयाळू संवेदनशील अंतरंग त्यांच्यापासून दूर राहणाऱ्या परंतु त्यांच्या पुस्तकांनी प्रेरित झालेल्या हुतात्मा भगतसिंग यांनाही अवगत होते. त्यांनी सावरकरांचे वर्णन क्रांतीच्या मार्गावरून चालताना पायाखाली येणारे कोवळे गवत चिरडले जाऊ नये म्हणून क्षणभर थांबणारा कोमल हृदयाचा क्रांतिकारक असे केले आहे. सावरकरांच्या या सर्व विचारांमुळे आणि कार्यामुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मरण करणे हे आपले स्वार्थ साधणारे आहे व कर्तव्य सुद्धा आहे. त्यांचे आचरण, विचार आणि साहित्य आपल्याला नेहमी पुढच्या वाटचालीसाठी प्रकाश देत राहते. माझ्या सर्व बांधवांना वाचकांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

_ चंद्रशेखर साने, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.