महाराष्ट्र मिलिटरी स्कूल हे राष्ट्रभान जागृत करणारे विद्यापीठ – ग्रुप कॅप्टन निलेश देखणे

235

अंगी शिस्त, उचित ध्येय आणि देशाप्रती वचनबद्धता असल्याशिवाय सैनिक घडत नाही. असे ध्येयवादी सैनिक घडवण्यासाठी मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूल अगदी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने राष्ट्रभान जागृत करणारे विद्यापीठ आहे, असे गौरवोद्गार ग्रुप कॅप्टन निलेश देखणे यांनी काढले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रभक्ती समिती यांच्यातर्फे आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ग्रुप कॅप्टन निलेश देखणे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह-कार्यवाह स्वप्नील सावरकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता राजे-सावरकर, राष्ट्रभक्ती समितीचे सर्वपक्षीय सभासद सुनील पवार, विजय सुर्वे, सुरेशचंद्र तारकर, विवेक भाटकर, रवींद्र मेणकुरकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी उद्यान परिसरात संचलन केले.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रुप कॅप्टन निलेश देखणे म्हणाले, अतिशय शिस्तबद्ध रितीने संचलन करणाऱ्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक. त्यांचे वय आणि त्यांनी अंगिकारलेली शिस्त पाहता, देशाचे भविष्य उज्वल आहे, याची प्रचिती येते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभान जागृत करण्याचे हेच योग्य वय आहे. तुम्हाला जर सैन्य दलांत उज्वल भविष्य घडवायचे असले, तर आतापासूनच शरीर, बुद्धी आणि ध्येय यांची योग्य सांगड घालत न थांबता अथक परिश्रम घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

२४ वर्षे देशसेवेचे भाग्य

  • गेल्या २४ वर्षांत जी देशसेवा करता आली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना अगदी लहान वयात सैनिकी प्रशिक्षण मिळत आहे. त्यामुळे ते माझ्यापेक्षा भाग्यशाली आहेत.
  • शिस्त, उचित ध्येय आणि वचनबद्धतेचे घडे तुम्हाला कोवळ्या वयात मिळत आहेत. तुम्ही कोणाकडून काय शिकता हे महत्त्वाचे आहेच, पण ते तुम्ही कसे आत्मसात करता, यावर भविष्याची वाटचाल अवलंबून आहे.
  • त्यामुळे लहान वयात ज्या-ज्या गोष्टी शिकायला मिळतात, त्या शिकून घ्या. आवांतर वाचन करून बौद्धिक क्षमता जास्तीत जास्त वाढवा. अगदी रामायण, पंचतंत्रही सोडू नका. व्यक्तिमत्त्व विकासावरही लक्ष द्या.
  • आपल्याकडचे विद्यार्थी अभ्यास खूप करतात, पण त्यांना एखाद्या व्यापसीठावर बोलायला लावले की, घाबरतात. त्यामुळे त्याचाही सराव करा. सावरकर स्मारक ही देशातील एकमेव अशी संस्था आहे, जी मुलांच्या विचारधारांना, बुद्धीला चालना देणारे उपक्रम राबवते, असे गौरवोद्गार देखणे यांनी काढले.

मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी वेळ काढा

हल्ली दोन्ही पालक नोकरी-व्यवसायात व्यस्त असल्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण मुलांच्या उज्वल भविष्यासाठी वेळ काढणे ही पालकांची जबाबदारी आहे. कितीही व्यस्त असला, तरी त्यांच्यासाठी काही वेळ राखून ठेवा. कुठलाही एक दिवस, तास काढा. त्यांना एक विषय द्या. बोलायला लावा. शूर विरांच्या शौर्य गाथा वाचायला द्या. त्यामुळे राष्ट्रभान जागृत होईलच, शिवाय सुपरमॅन पेक्षा आपले हे खरे हिरो त्यांना आवडायला लागतील, असेही देखणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.