भविष्यात सर्व बसगाड्या इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या असतील; बेस्ट महाव्यवस्थापकांचा विश्वास

159

कोरोना सारख्या महामारीत काळातही बेस्टने आपल्या कार्यक्षम सेवेची परंपरा कायम राखली. त्याचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतूक झाल्याचे सांगत बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापन लोकेश चंद्र यांनी बेस्ट उपक्रमाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आज संपूर्ण भारतात सर्वाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या फक्त बेस्टकडेच आहेत. आज बेस्ट उपक्रमाकडे इलेक्ट्रिक, एसी, दुमजली बससह एकूण ३६८० बसगाड्या असून भविष्यात एकूण १०,००० बसगाड्यांचे लक्ष्य ठेवणाऱ्या बेस्टच्या सर्व बसगाड्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या असतील, असाही विश्वास त्यांनी ध्वजारोहण प्रसंगी बोलतांना व्यक्त केला.

बेस्ट परिवहन विभागाची उतुंग व ऐतिहासिक कामगिरी 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात घरोघरी तिरंगा फडकवून मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत बेस्ट उपक्रमानेही महापालिकाकरणाचा अमृत महोत्सव कुलाबा,  बेस्ट भवन येथील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी उत्साहात साजरा केला. भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१५ वाजता बेस्ट उपक्रमाचे प्रशासक तथा महाव्यवस्थापक माननीय लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते कुलाबा, बेस्ट भवन येथील बेस्टच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज तिरंगा डौलात फडकविण्यात आला. १८७३ साली स्थापन झालेल्या बेस्ट कंपनीने सुरवातीला सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून कुलाबा ते पायधुणीपर्यंत घोड्यांनी ओढली जाणारी ट्राम मुंबईकरांच्या सेवेत आणली. ७ ऑगस्ट १९४७ साली बेस्ट उपक्रमाचे महापालिकाकरण झाले. आज बेस्ट परिवहन विभागाने २०२२ पर्यन्त उतुंग व ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रारंभी घोड्यांच्या साहाय्याने ओढली जाणारी ट्रामसेवा देणारी बेस्टने हळूहळू विजेवरील ट्राम, एक मजली बस, दुमजली बस, पेट्रोल, डिझेल, सीएनजीवरील बससेवा देतदेत आज इलेक्ट्रिक  व एसी बस सेवा तोटा सहन करीत अगदी माफक दरात बस सेवा देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे.

(हेही वाचा ओबीसी, मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार गंभीर – मुख्यमंत्री)

भारतात सर्वाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या फक्त बेस्टकडे

याप्रसंगी, महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी, आजपर्यंत माफक दरात दर्जेदार बससेवा आणि वीजपुरवठा देण्यात बेस्टने आपला नावलौकिक राखल्याचे सांगितले. तसेच, कोरोनासारख्या महामारीत, अगदी टाळेबंदीच्या काळात देखील बेस्टने आपल्या कार्यक्षम सेवेची परंपरा कायम राखली. त्याचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतूक झाल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगत बेस्टच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आज संपूर्ण भारतात सर्वाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या फक्त बेस्टकडेच आहेत. आज बेस्ट उपक्रमाकडे इलेक्ट्रिक, एसी, दुमजली बससह एकूण ३६८० बसगाड्या असून भविष्यात एकूण १०,०००  बसगाड्यांचे लक्ष्य ठेवणाऱ्या बेस्टच्या सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या असतील, असे प्रशासनाने ठरवले आहे. दुसरीकडे विनाखंडित वीजपुरवठा करणारी बेस्ट ही राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था आहे. यापुढेदेखील बेस्ट उपक्रम अशीच सेवा मुंबईकरांना देत राहील, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.