भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत पूरपरिस्थिती; १,५३१ नागरिकांचे स्थलांतर

127
नागपूर विभागामध्ये गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत १ हजार ५३१ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असून, मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.
कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. कुठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. नागपूर विभागामध्ये गेल्या २४ तासांत सरासरी २१.५५ मिमी पाऊस झाला असून भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २६.२ मिमी एवढा पाऊस झाला असून, बाघ व बावनथडी या नद्या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. पूरग्रस्त भागातील २०० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

  • गोंदिया जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती व वैनगंगा नदी पातळीत झालेली वाढ याचा परिणाम भंडारा जिल्ह्यावर झाल्याने भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
  • गेल्या २४ तासांत भंडारा जिल्ह्यात २५ मिमी एवढा पाऊस झाला असून, वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. पूरग्रस्त भागातील ९०० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
  • सद्यस्थितीत जिल्ह्यात एसडीआरएफचे एक पथक व स्थानिक शोध आणि बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.
  • गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३५.१ मिमी पाऊस झाला. त्यामुळे प्राणहिता नदी धोका पातळीच्या वर वाहत असून, पूरग्रस्त भागातील ४३१ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
  • सद्यस्थितीत जिल्ह्यात एसडीआरएफची दोन पथके व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.

( हेही वाचा: मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मुंबईला यलो अलर्ट जारी )

राज्यात आतापर्यंत किती नुकसान झाले?

राज्यात १ जूनपासून आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २९  जिल्हे व ३२५ गावे प्रभावित झाली आहेत. ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून, २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे १२० नागरिकांनी  आपला जीव गमावला, तर २४३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: आणि ३ हजार ५३४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.