राज्यातील सत्तासंघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. खरी शिवसेना, पक्ष चिन्ह, शिंदे गटातील आमदारांचे निलंबन यांबाबत दोन्ही गटांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांना सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख मिळत आहे.
पण आता याचबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात मागणी केली आहे. आमच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात मागणी
शिंदे गटाकडून शिवसेना पक्षाबरोबरच धनुष्यबाण या पक्षचिन्हावर देखील दावा सांगण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निर्णय देण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर निकाल देण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक भूमिका घेतली असून, या प्रकरणाची सुनावणी लवकरच घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः नवे शिवसेना भवन, मग जुन्या शिवसेना भवनाचे काय?)
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर कोणाचा हक्क आहे याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 19 ऑगस्ट रोजी निर्णय देण्यात येणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये, अशीही मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community