अटकेदरम्यान अवलंबण्यात येणारी प्रक्रिया आणि अटकेची कारणे नोंदवण्याबाबत पोलीस महासंचालकांनी नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत राज्यातील प्रत्येक पोलीस कर्मचा-याने 30 ऑगस्टपर्यंत जागरुक व्हावे, असे आदेश उच्च न्यायालयान दिले आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, तर संबंधित पोलिसांवर तसेच त्यांच्या वरिष्ठांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने यावेळी दिला.
भारतीय दंड संहितेच्या कलम 498-ए अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर, अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणा-या ठाणेस्थित आरोपीच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने वरील आदेश दिले. तसेच, शासन आणि पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरही या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
( हेही वाचा: ‘आमच्या याचिकेवर लवकर सुनावणी द्या’, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात मागणी )
न्यायालयाचा आदेश
- अटकेची कारवाई योग्य होती आणि अटक करताना योग्य त्या प्रक्रियेचा अवलंब केला गेला हे पाहण्याची जबाबदारी वरिष्ठांची असेल, असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे.
- पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, तपास अधिका-याने पुरेसे पुरावे असल्याची शहानिशा केल्यानंतरच, आरोपीला अटक करण्याचा निर्णय घ्यावा.
- एकदा अटक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता आणि न्यायालयाच्या मागील निकालांनुसार, अटक करण्याच्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल.