राष्ट्रगीताचे समूह गायन, विश्वविक्रमाची एक संधी – मुख्यमंत्री

162

दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने; ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रगीताचे समूह गायन हा उपक्रम विश्वविक्रमाची एक संधी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहे.

(हेही वाचा – मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! गुजरातमध्ये १ हजार कोटींचे ५१३ किलो MD ड्रग्ज जप्त)

राज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांना निर्देश देण्यात आल्याची माहिती, राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय निर्गमित केलेला असून, राज्याचे प्रशासन हा उपक्रम लोकसहभागातून साजरा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज व आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे, असे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले. राज्यातील अंगणवाड्या, सर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये/ सर्व प्रकारची विद्यापीठे/ खाजगी/ शासकीय सर्व शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थी, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, असेही सौरभ विजय यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या आवाहनास राज्यातील सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा आणि आपणा सर्वांच्या सहभागातून एक नवा विश्वविक्रम व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने सदर आवाहन असल्याचे सौरभ विजय यांनी नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.