बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी नाशिकहून आलेल्या तीन बिबट्यांच्या बछड्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना चेंबूर येथील खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यात शनिवारपासून उपचारासांठी वनाधिका-यांनी दाखल केले आहे. उद्यानात आल्यापासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा नव्हती तसेच उद्यानात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने उद्यानातील प्राण्यांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कर्करोगाचा सामना करणारी बिजली वाघीण, आर्थरायटीस आजाराने थकलेल्या रवींद्र आणि सापळ्यात अडकून पाय गमावलेल्या विरु वाघासह तीन बछड्यांची रोज देखभाल करायला कोणच पशुवैद्यकीय अधिकारी उद्यानाला मिळत नसून, विरु पायाच्या दुखापतीमुळे मार्च महिन्यापासून मानसिक धक्क्यात आहे. एक पाय गमावूनही उद्यानातील पिंज-यातून बाहेर पळता येते का, यासाठी धडपड करत आहे. परंतु अधिकारी जवळ जाताच स्वतःला पिंज-यात कोंडून घेत आहे.
३ जून रोजी वाघाटीच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीबाबत उद्यान प्रशासनाकडून कमालीची दिरंगाई होत आहे. उद्यान प्रशासनाने अधिका-यांना केवळ तोंडी चौकशी अहवाल दिल्याने कागदोपत्री अहवालासाठी दोन महिन्यांपेक्षाही मोठा काळ उलटला आहे. वाघाटीच्या उपचाराबबात नेमकी कोणती घटना घडली, याचा थांगपत्ता नसताना पिंज-यांतील वाघ, सिंह, बिबटे तसेच इतर प्राण्यांच्या दररोजच्या देखरेखीसाठी उद्यानात पशुवैद्यकीय अधिकारी गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ नेमण्यात आलेला नाही.
पशुसंवर्धन विभागात काम करणा-या निवृत्त पशुवैद्यकीय अधिका-यालाच आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांच्या देखभालीसाठी नियुक्त केले जाणार आहे. जाहिरातीनंतर केवळ एकाच माजी पशुवैद्यकीय अधिका-याचा अर्ज आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची साठीपार वयाची अट उद्यानाच्या चांगलीच अंगलट आली आहे. वयाची अट डावलून तरुण पशुवैद्यकीय अधिकारी नेमता येईल का, याचा विचार आता उद्यान प्रशासनाकडून होऊ लागला आहे.
बिजली या वाघीणीचीही बहिण मस्तानी कर्करोगामुळे मृत्यू पावली होती. बिजली वाघीणीलाही अनुवांशिक आजार असून, तिच्या पोटात गाठी आहेत. पोटातील गाठींमुळे बिजली वाघीणीचे वजन भलतेच वाढले आहे. याआधी एकदा वजन वाढलेल्या बिजली वाघीणीला उद्यान प्रशासनाने गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. १० जून रोजी नाशिक येथे सापडलेली तीन बछड्यांची पिल्ले उद्यानात उपचारांसाठी वनविभागाने पाठवली परंतु या तिन्ही बछड्यांना उठता किंवा बसता येत नाही. याबाबत सतत संपर्क करुनही उद्यानाचे संचालक तसेच मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
Join Our WhatsApp Community