17 ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्व संध्येला राज्य सरकारकडून विरोधी पक्षांना चहापानाचे आमंत्रण देण्यात आले होते. पण या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला.
ते करू शकले नाहीत ते आम्ही करू
चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत विरोधी पक्षांनी सत्ताधा-यांना सात पानी पत्र दिले होते. या पत्रामधील चार पानं आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना दीड महिन्यांपूर्वी आपण सत्तेत होतो याची विस्मृती झाल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. पण आमच्या मंत्रिमंडळावर विरोधी पक्षांचा देखील विश्वास दिसत आहे. त्यामुळे जे ते करू शकले नाहीत त्या अपेक्षा आम्ही नक्की पूर्ण करू,असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
(हेही वाचाः आर्थर रोड जेलमध्ये ९ विशेष बॅरेकची निर्मिती; चर्चेला उधाण)
त्यांना गजनीची लागण
विरोधक आमच्या सरकारला बेईमानीने आलेलं सरकार म्हणत आहेत. पण विधानसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी एकत्रित युती केली होती तेच दोन पक्ष एकत्र येऊन हे सरकार तयार झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्रिमंडळाचं खातेवाटप हे उशिराने झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षांना गजनीची लागण झाल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community