संतोष बांगर : नेत्यांनी कायदा हातात घेणे अपेक्षित नाही

125

शिवसेनेचे नेते संतोष बांगर सध्या भलतेच चर्चेत आलेले आहेत. त्यांनी एका भ्रष्ट व्यवस्थापकाच्या कानशिलात वाजवली असून त्या व्यवस्थापकाने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. शुभम हरण असं या व्यवस्थापकाचं नाव आहे. मध्यान्ह भोजन अंतर्गत कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवणार्‍या गोडाउनमध्ये व्यवस्थापक म्हणून शुभम हरण काम करतात. शुभम कामगारांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवतात या कारणास्तव बांगर यांनी त्यांना मारहाण केली आहे.

( हेही वाचा : प्रसारमाध्यमांच्या ‘न्यूड’ बातम्या, लोकशाहीचा चौथा स्तंभ घसरलाय)

काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंचे सहकारी राम कदम व इतर मनसे नेत्यांनी अबू आझमी यांना मारहाण केली होती. ही मारहाण लोकशाहीच्या मंदिरात झाली. आता राम कदम भाजपामध्ये आले आहेत. पण जनता जेव्हा नेत्यांना निवडून देते तेव्हा या नेत्यांकडून विधायक कामगिरीची अपेक्षा असते. रस्त्यावरील गुंडांप्रमाणे जर नेते वागू लागले तर त्यांना जनतेने निवडून का दिलं असतं?

शुभम हरण यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत परंतु बांगर यांच्याविरोधात तक्रार करण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे अद्याप तरी शुभम हरण यांची भूमिका संशयास्पद वाटते आहे. समजा शुभम हरण हे कामगारांना निकृष्ट दर्जाचं अन्न देत असले तरी संजय बांगर यांना स्टंटबाजी करायची गरज नव्हती. त्याऐवजी त्यांनी शुभम यांना ताकीद द्यायला हवी होती व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती.

जेणेकरुन भविष्यात अशा घटना कमी झाल्या असत्या. आता या स्टंटबाजीमुळे कोण खरं आणि कोण खोटं हेच कळत नाही. जनतेचा प्रश्न तर सोडवला गेला नाही. उलट नवा वाद निर्माण झाला. शुभम हरण यांच्या म्हणण्यानुसार बांगर यांना खरोखर गौरसमज झाला की राजकीय चर्चेत राहण्यासाठी बांगर यांनी मुद्दामून स्टंट केला, हे कळायला मार्ग नाही. बांगर संवैधानिक पदावर आहेत, ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

आपण कोणत्याही चित्रपटाचे हीरो नाही, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणूनच त्यांना अभिनय व ऍक्शन सिक्वेन्स द्यायची गरज नाही. ते आमदार आहेत. त्यांनी त्यांचं काम करावं, ज्यासाठी त्यांना जनतेने निवडून दिलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.