महाराष्ट्राचा राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. यापुढील काळात या विभागाचे उत्पन्न वाढेल आणि रिक्त पदे भरली जातील, यादृष्टीने प्रयत्न करू, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, आयुक्त के. बी. उमाप, सहआयुक्त यतीन सावंत तसेच राज्यातील उत्पादन शुल्क विभागाचे सर्व उपायुक्त उपस्थित होते. विभागाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने देसाई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला महसुली उत्पन्न मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. राज्यमंत्री म्हणून या विभागाची जबाबदारी गेली अडीच वर्षे सांभाळल्याने या विभागाचा अनुभव आहे. कोरोनाकाळात विभागाचे उत्पन्न काही प्रमाणात कमी झाले होते, परंतु गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा उत्पन्नवाढ झाली आहे. विदेशी मद्याचे दर कमी केल्याने चोरट्या मार्गाने होणारी विक्री कमी झाली असून, यामुळे करात आणि कायदेशीर विक्रीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
करचुकवेगिरी करणाऱ्यांवर विशेष लक्ष
येत्या काळात करचुकवेगिरी करणाऱ्यांना आळा बसेल, यादृष्टीने उपाययोजना करा. त्यासाठी जिल्हा स्तरावरील यंत्रणा कार्यक्षम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच विभागातील सुमारे ३३-३४ टक्के पदे रिक्त असून, तीदेखील येत्या काळात भरून मनुष्यबळात वाढ करू. राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. मॉलमधील मद्यविक्रीबाबत जनतेकडून मागविण्यात आलेल्या सूचनांची पडताळणी करून लवकरच त्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community