दोन दिवसांवर दहीहंडी उत्सव येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाची भीडभाड न बाळगता बिनधास्त उत्सव साजरा करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. या उत्सवाचा केंद्रबिंदू ठाणे आहे, याच ठाण्यातून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. हा भूकंप घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले आणि मुख्यमंत्री बनले. शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली आणि शिवसेनेवर दावा केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने आपण शिवसेना चालवणार आहे, अशी घोषणा करणारे एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात दहीहंडीच्या निमित्ताने शिवसेनेवरील नियंत्रण किती आहे, याचे प्रमाण दिसणार आहे.
ठाण्यात संघर्ष गडद होणार
ठाण्यातील टेम्भी नाक्याची दहीहंडी ही शिवसेनेची आणि धर्मवीर आनंद दिघे यांची दहीहंडी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी या हंडीचे आयोजन शिवसेना करते, यासाठी एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांचेही योगदान असते, पण यंदा शिवसेनेत फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना! सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कुणाची हा विषय प्रलंबित आहे. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र ‘आम्हीच शिवसेना’ असे सांगत आहेत आणि त्याप्रमाणे पक्षांतर्गत नेमणुका करत आहेत. मात्र हा संघर्ष गडदपणे ठाण्यात दिसून येणार आहे. त्याला निमित्त दहीहंडी उत्सव बनणार आहे.
(हेही वाचा आर्थर रोड जेलमध्ये ९ विशेष बॅरेकची निर्मिती; चर्चेला उधाण)
एकनाथ शिंदे की राजन विचारे?
ज्यांना आदर्श मानत शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले, असे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने टेम्भी नाक्यामध्ये दहीहंडी बांधली जाते. त्या दहीहंडीवर कोण हक्क गाजवणार, हा प्रश्न आहे. कारण जरी एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले असले तरी ठाण्यातील शिंदे यांचे सहकारी खासदार राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची सोबत सोडली नाही, तसेच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना विरोध करत उद्धव ठाकरे यांची कास धरली आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीच्या वेळी एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या दहीहंडीचे नेतृत्व करणार की राजन विचारे नेतृत्व करणार हा प्रश्न आहे.
Join Our WhatsApp Community