भाजपच्या संघटनात्मक पातळीवरच्या महत्त्वाच्या नेमणुका बुधवारी जाहीर झाल्या असून भारतीय जनता पक्षाने नवीन संसदीय आणि निवडणूक समितीची घोषणा केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्थान मिळालेले नाही. गडकरींना या समितीबाहेर ठेवणे हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय. मात्र महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. संसदीय समिती, भाजप पक्षातील या सर्वोच्च समितीची पुर्नरचना जाहीर करण्यात आली असून यामध्ये काही महत्वपूर्ण बदल पक्षांकडून करण्यात आले आहेत..
(हेही वाचा – राजकीय पक्षांना आश्वासन देण्यापासून रोखणे अशक्य, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी)
महाराष्ट्रातून फडणवीसांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान
महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीसांसह अनेक माजी मुख्यमंत्र्यांचा संसदीय समितीत समावेश होईल असे मानले जात होते. मात्र, त्याऐवजी त्यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची, त्यातली तिकीट वाटप अंतिम करण्याचे काम याच महत्वपूर्ण समितीत केले जाते. संसदीय समितीत एकूण 11 सदस्य आहेत. त्यापैकी केवळ एक महिला आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर या महत्वाच्या समितीत निर्मला सीतारमन किंवा स्मृती इराणी यांचा समावेश होईल असे अपेक्षित होते. परंतु, त्याऐवजी हरियाणाच्या सुधा यादव यांना संधी दिली आहे. या संघटनात्मक बदलांमधून भाजपच्या अंतर्गत रचनेतही आता मोदी-शाहांचीच पकड मजबूत झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
संसदीय समितीत या 11 जणांची निवड
पक्षाच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना संधी दिली गेली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना वगळण्यात आले आहे. संसदीय समितीत आता अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, येडीयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, श्री के लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी. एल. संतोष या 11 जणांचा समावेश असेल तर भाजपच्या या संसदीय समितीत आता महाराष्ट्रातला एकही नेता नसेल.
भाजपच्या संसदीय मंडळाची यादी
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जाटिया, बी. एल. संतोष (सचिव).
भाजपची केंद्रीय निवडणूक समिती
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बी.एल.संतोष (सचिव), वनथी श्रीनिवास.
Join Our WhatsApp Community