विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची CID चौकशी करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री यांचे पोलीस महासंचालकाना मेटे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश

116

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार असून तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

(हेही वाचा – भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरी ‘आऊट’ फडणवीस ‘इन’)

मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच माध्यमांशी बोलताना त्यांनी मेटेंच्या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज, बुधवारी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भावूक

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनायक मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. माझा विश्वासच बसत नाही. त्यांच दुःखद निधन झालं आहे. त्यांनी मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं केली आहे. शिवरायांच्या स्मारकाबद्दलचीही त्यांची तळमळ मला जाणवली. ही घटना महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी दुःखद आहे. मराठा समाजासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाठपुरावा केलाय, असा नेता आपल्यात नाही. त्यांचं दुःखद निधन झालंय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.