शहरातील एन-3, सिडको भागात एक धक्कादायक घटना समोर आली असून, गाडीवर चालक म्हणून कामाला असलेल्या व्यक्तीला कामावरुन काढले तो चक्क मालकाच्या घरात तलवार घेऊन घुसला. तर घरात घुसल्यावर मालकाच्या कुटुंबाला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र गुन्हेशाखेला वेळीच माहिती मिळाल्याने, त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला पकडले.
संजय कोंडिबा नागरे हे एक व्यावसायिक असून वाळूज एमआयडीसीत बीअरची कंपनी चालवतात. आरोपी बबन बालाजी फड हा नागरे यांच्या गाडीवर चालक म्हणून कामाला होता. मात्र त्याच्या दारु पिण्याच्या सवयीने नागरे यांनी त्याला काही दिवसांपूर्वी कामावरुन काढून टाकले होते. त्याचा राग मनात धरुन फड हा नागरे यांच्या एन-3 मधील घरी गेला. तेव्हा त्याच्या हातात तलवार होती. कामावरुन काढल्याच्या रागातून बबन फड हा तलवार घेऊन नागरे यांच्या घरात घुसला. यावेळी घरात नागरे यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. बबन तलवार घेऊन घरात घुसल्याने, घरातील सर्वजण प्रचंड घाबरले. नागरे यांनी हा सर्व प्रकार तत्काळ पोलिसांना कळवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपीला अटक केली.
( हेही वाचा: नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांचा राजीनामा )
अन् मोठा अनर्थ टळला
पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे शाखेचे गस्तीवरील पथक तत्काळ संजय नागरे यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी नागरे यांच्या घरात आरोपी बबन फड तलवार घेऊन उभा होता. पोलिसांनी बबनला ताब्यात घेतले. त्यानंतर नागरे यांच्या तक्रारीनंतर पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community