भंडारा बलात्कार प्रकरणी विधान परिषदेत गोंधळ

130
विधान परिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच भंडारा – गोंदिया येथे महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. ही घटना गंभीर आहे, त्यामुळे सभागृहाचे कामकाज रद्द करून या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला आणि सभागृह दोन वेळा स्थगित करण्यात आले.

राज्यात महिला असुरक्षित – खडसे

त्यानंतर आमदार एकनाथ खडसे यांनी हे प्रकरण गंभीर आहे, महिलांवर वारंवार अत्याचार होत आहेत. पोलीस हलगर्जीपणा करत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. हा कळस आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापेक्षा दुसरा कोणताही विषय गंभीर असू शकत नाही. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभर रद्द करावे आणि यावर चर्चा करावी, अशी मागणी केली. तर आमदार कायंदे म्हणाल्या आम्ही त्या महिलेला भेटून आलो, जेव्हा ती पीडित महिला पोलीस ठाण्यात गेली तेव्हा पोलिसांनी तिला रात्रभर बसवून ठेवले पण तिची तक्रार लिहून घेतली नाही, शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी ती महिला निघून गेली, हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे.
( हेही वाचा: नाशिक मध्यवर्ती कारागृहात १०-१२ कैद्यांचा हल्ला! पोलीस अधिकारी गंभीर जखमी )

शक्ती कायद्याचा पाठपुरावा करा – उपसभापती
यानंतर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी गटनेत्यांशी बोलून लवकरच सभागृहात यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. या महिलेला संरक्षण मिळाले पाहिजे आणि या प्रकरणी ज्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांची बदली केली जाऊ नये. त्या महिलेवर अनेक शस्त्रक्रिया सुरू आहेत. राज्य सरकारने तातडीने शक्ती कायदा संमत करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.