नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान UDAN (उडे देश का आम नागरिक) या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेस 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत 27 एप्रिल 2017 रोजी पहिले उड्डाण झाले. सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही योजना 21 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. उडे देश का आम नागरिक व्हिजननुसार द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांना वाढीव विमान वाहतूक पायाभूत सुविधा आणि हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली.
महाराष्ट्रात 6 ठिकाणी योजना उपलब्ध
गेल्या पाच वर्षांत, उडानने देशातील प्रादेशिक हवाई-कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. 2014 मध्ये कार्यान्वित असलेले 74 विमानतळ होते. उडान योजनेमुळे ही संख्या आता 141 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सध्या गोंदिया, जळगांव, कोल्हापूर, नांदेड, नाशिक आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी ही योजना उपलब्ध आहे.
उडान योजनेअंतर्गत 58 विमानतळ, 8 हेलीपोर्ट आणि 2 वॉटर एरोड्रोम्स यांचा समावेश असलेल्या 68 कमी सेवा दिलेली/सेवा न दिलेली ठिकाणे जोडली गेलेली आहेत. योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 425 नवीन मार्गांसह, उडानने देशभरातील 29 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे. 4 ऑगस्ट 2022 पर्यंत एक कोटीहून अधिक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेने प्रादेशिक वाहक कंपन्यांना त्यांचे कामकाज वाढवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे.
(हेही वाचा – ATS ची मोठी कारवाई! गुजरातमध्ये पुन्हा हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त)
प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना उडानचे यश हे पंतप्रधानांच्या ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेशी सरकारच्या असलेल्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी म्हटले आहे. ”भारतीय हवाई वाहतूक उद्योगाच्या परिवर्तनात या योजनेने मोठी भूमिका बजावली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत आपल्याकडे असलेले 425 मार्ग 1000 मार्गांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे, तर 68 नवीन विमानतळांची संख्या 100 करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील 4 वर्षात भारतात 40 कोटी प्रवासी नागरी विमान सेवेचा वापर करतील अशी अपेक्षा आहे. रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीसोबतच नागरी विमान वाहतूक ही भारतातील वाहतुकीचा आधार होण्याचे दिवस आता दूर नाही.” असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community